पावसाची उघडीप; पाच दिवसानंतर घडले सूर्यदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:04+5:302021-07-17T04:25:04+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात पाच दिवसानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी नागरिकांना सूर्यदर्शन घडले. दरम्यान, गेल्या २४ तासात ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाच दिवसानंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शुक्रवारी दुपारी नागरिकांना सूर्यदर्शन घडले. दरम्यान, गेल्या २४ तासात एकूण ९६६.२० (सरासरी १०७.३६) मिलिमीटर पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे. सर्वाधिक १६९.१० मिलिमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात झाला असून, त्याखालोखाल गुहागर ११८, लांजा ११४.८०, संगमेश्वर १११, मंडणगड १०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील भोपण येथील मेहमुद्दीन इब्राहीम अमुळे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशत: ३ हजार रुपये नुकसान झाले. पांगरी तर्फ हवेली येथील मधुकर जाधव यांच्या घराजवळ दरड कोसळून अंशत: नुकसान झाले. रघुनाथ जाधव यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले.
चिपळूण तालुक्यात वीरवाडी येथील सार्वजनिक पाण्याची विहीर पावसामुळे कोसळली आहे. दहिवली येथील खासगी शाळा दहिवली खुर्द ३ ची पडीक इमारत कोसळून २४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यातील मळवळी येथील दत्ताराम रामचंद्र डाफळे यांच्या घराचे अंशत: ५ हजार रुपये नुकसान झाले. वामन गोविंद पालशेतकर यांच्या घराचे अंशत: १ लाख २५ हजार रुपये नुकसान झाले. सुरेखा सुरेश तांदळे यांच्या घराचे अंशत: ३ हजार रुपये नुकसान झाले.
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथील वसंत शिवराम चव्हाण यांच्या घराजवळ रस्त्याची मोरी खचल्याने घरात पाणी शिरले आहे. हातीव येथील हरी तातू शिगवण यांच्या घराचे अंशत: ४० हजार रुपये नुकसान झाले. डावखोल येथील सुरेश आत्माराम शिंदे यांच्या घराचे अंशत: २० हजार नुकसान झाले. कांटे येथील गजानन शिवराम बाणे यांच्या घराचे अंशत: २ हजार रुपये नुकसान झाले.
रत्नागिरी तालुक्यात गावखडी येथील अमेय जनार्दन कातळकर यांच्या शेतात पावसामुळे विजेचे खांब पडले आहेत.