दुसऱ्यासमोर व्यक्त व्हा, पण आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याचीही तितकीच काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 07:27 PM2018-04-17T19:27:02+5:302018-04-17T19:27:02+5:30
आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे. आपल्या भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याचे ते एक उत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजावरून त्याच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याची काळीजीही तितकीच घ्यायला हवी, असे मत डॉ. शमा कोवळे या व्यक्त करतात.
शोभना कांबळे
रत्नागिरी : आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे. आपल्या भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याचे ते एक उत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजावरून त्याच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याची काळीजीही तितकीच घ्यायला हवी, असे मत डॉ. शमा कोवळे या व्यक्त करतात.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील एका प्रख्यात रूग्णालयात त्या स्वरयंत्र तंत्रज्ञ तसेच नाक, कान, घसातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसं पाहील तर सामान्य नागरिकांनी आपल्या आवाजाची काळजी घ्यायलाच हवी, पण गायक, निवेदक, अभिनेता, वक्ता, शिक्षकवर्ग आदी व्यवसायासाठी आपल्या आवाजाचा उपयोग करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
या मंडळींना आवाजात वारंवार चढ-उतार करावे लागतात. आपल्या आवाजाची तीव्रता स्वरपेटीच्या स्पंदनावर ठरते. मोठ्या आवाजासाठी स्पंदनाची तीव्रता वाढवावी लागते, परिणामी स्वरपेटीवर त्याचा परिणाम होत राहतो. बरेचदा आपण आपल्या आवाजाशी संबंधीत आजाराकडे दुर्लक्ष करतो. आवाज बसण्याची समस्या अनेकांना जाणवते. कधी सर्दी, थायरॉईड यांसारखे आजार तर कधी मर्यादेपेक्षा उच्च स्वरात ओरडल्यानेही आवाज बसू शकतो.
प्रत्येकवेळी आपण आवाजाकडे लक्ष देतोच, असे नाही. त्रास होऊ लागला तर घरगुती उपाय करतो. आवाज चांगला राहावा, आवाजातील बदलाला कसे सामोरे जावे, याचेही एक शास्त्र आहे. ते माहित व्हावे, यादृष्टीने काळजी घ्यावी लागते. व्यवस्थित काळजी घेऊनही आवाजात दोष आढळत असतील किंवा वारंवार त्रास उद्भवत असतील तर स्वरतज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा.
आवाजाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वरयंत्र
आपल्या आवाजाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वरयंत्र. सर्वसाधारणपणे आवाज तयार होण्याची प्रक्रिया तीन भागात होते. पहिली स्वरयंत्र, दुसरी फुफ्फुसे आणि तिसरी जीभ, गाल, टाळा, ओठ आदी. जेव्हा फुफ्फुस पुरेशी हवा पंप करते, तेव्हा स्वरपेटी स्पंदन पावते आणि आवाज तयार होतो. स्वरयंत्रातील दुसरे स्नायू ताण, तीव्रता कमी करतात व तो आवाज गाळून बाहेर पोचवतात.
कोणत्याही व्यक्तिचा आवाज त्या व्यक्तीचे वय, त्याच्या भावना, लिंग सांगू शकतात. उदा. स्त्रीचा आवाज बारीक असतो, रडताना आवाजात कंप येतो. व्यावसायिक याच तंत्राचा वापर करून आवाजामध्ये चढ - उतार आणू शकतात. आपला आवाज किती आणि कसा वापरायचा, हे स्वरपेटी ठरवत असते. ज्याना आवाजातील चढ-उतार कसे करायचे, हे काळात नाही त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले जाते. व्यावसायिक या तंत्राचा वापर करून आवाजात चढ-उतार करीत असतात आपण आपला आवाज किती आणि कसा वापरायचा, आपली स्वरपेटी किती उघड झाप करायची, हे ठरवू शकतो. व्यावसायिक आवाजाचा वापर करणारे हे तंत्र वापरतात. ज्यांना आवाजात चढ-उतार करता येत नाही, त्यांच्यासाठी व्हाईस मॉड्यूलेशनचे विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे.
- डॉ. शमा कोवळे,
स्वरयंत्रतज्ज्ञ