सानुग्रह साहाय्य लागू करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:30 AM2021-05-16T04:30:15+5:302021-05-16T04:30:15+5:30
राजापूर : कोविड -१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख सानुग्रह साहाय्य लागू करण्यास दि. ...
राजापूर : कोविड -१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख सानुग्रह साहाय्य लागू करण्यास दि. ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ यासाठी आमदार राजन साळवी यांनी सातत्याने प्रयत्न केले हाेते.
कोविड -१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपये सानुग्रह साहाय्य लागू करण्याचे आदेश दिनांक २९ मे २०२० राेजी देण्यात आले हाेते; परंतु त्याची मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी संपली़ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहता आमदार राजन साळवी यांनी कोविड-१९ संबंधी कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली हाेती़ तसेच जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२१ दरम्यान कर्तव्य बजावताना मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही सानुग्रह अनुदान मिळण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय होणेबाबत राजन साळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला हाेता़
या पत्राची दखल घेऊन त्याअनुषंगाने कोविड-१९ साथीची सद्य:स्थिती विचारात घेता दिनांक २९ मे २०२० च्या शासन निर्णयास दिनांक १ जानेवारी २०२१ पासून दिनांक ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्याबाबतचे आदेश शासनाने १४ मे २०२१ राेजी दिले असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली़