परीक्षेसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:33+5:302021-03-26T04:31:33+5:30
रत्नागिरी : पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ...
रत्नागिरी : पाचवी, आठवीतील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत ३० मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.
सहाणेचा जीर्णोद्धार
देवरुख : तांबेडी, निवेग्री गावांतील नवलादेवीच्या सहाणेचा जीर्णोद्धार सोहळा २७ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. तसेच या दिवशी मिरवणूक, सत्कार समारंभ, महाप्रसाद, भजन, आदी कार्यक्रम होणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
दापोली : कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय पिनचॅक सिलॅट चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्ञानदीप दापोलीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संतोषभाई मेहता स्कूलचा शंतनू झगडे, ज्ञानदीप माध्यमिक विभागातील शर्वरी शिगवण, भक्ती माळी यांनी सुवर्णपदक; तर ‘‘ज्ञानदीप’चा वैष्णव शिंदे याने रौप्यपदक पटकावले.
शैक्षणिक साहित्य वाटप
सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे भागशाळा खरवते विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनंत घाग हे होते. यावेळी वालावलकर ट्रस्टतर्फे ३८४ वह्या तसेच गणवेश वाटप करण्यात आले.
रस्त्याचे भूमिपूजन
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी केतकडेवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. केतनेवाडी येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांपासूनची रस्त्याची ही मागणी प्रलंबित होती. मात्र या रस्त्याबाबत आमदार शेखर निकम यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आता रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
शिष्यवृत्तीसंदर्भात बैठक
राजापूर : तालुक्यातील पूर्व भागातील पाचल येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयात शिष्यवृत्तीसंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. एस. एस. धोंगडे यांनी विविध शिष्यवृत्ती संदर्भात माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या अर्जामधील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.
झाडांचे संगोपन
रत्नागिरी : तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पर्यावरण विभागातर्फे नारळ, सुपारी या रोपांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांसाठी सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. गतवर्षी लागवड केलेल्या झाडांच्या संगोपनाचे काम सुरू आहे.
पदे भरण्यास मंजुरी
रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांची रिक्त पदे भरण्याला हिरवा कंदील दिला आहे. या विभागाकडून नुकतेच आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे २६० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हापूसची चव आंबटच
रत्नागिरी : अवकाळी पाऊस आणि सतत बदललेल्या हवामानामुळे गतवर्षीच्या तुलनेत आता केवळ १५ टक्केच आंबा बाजारात आल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत अजूनही हापूस विक्रीला आलेला नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही हापूसच्या चवीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शिमगोत्सव साध्या पद्धतीने
सावर्डे : येथील श्रीदेव केदारनाथ देवस्थानतर्फे शिमगोत्सव गावातील प्रमुख ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. होळीच्या दिवशी जत्रोत्सव होणार नाही. केवळ धार्मिक विधी होणार आहेत.