महानिर्मिती प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ
By admin | Published: February 12, 2016 10:17 PM2016-02-12T22:17:03+5:302016-02-12T23:45:02+5:30
प्रकल्पग्रस्त उमेदवारांना दिलासा : सेवासमाप्तीऐवजी सेवावाढ देण्याची सूचना
शिरगाव : प्रकल्पग्रस्त उमेदवारांची महानिर्मिती कंपनीत नोकरीसाठी सुरु असलेली धडपड आणि व्यवस्थापनाने घेतलेले अन्यायकारक निर्णय याबाबत ऊर्जामंत्र्यांशी चर्चा घडवून आणली. येत्या दोन-चार दिवसात बीटीआरआय प्रशिक्षणार्थींना सेवासमाप्तीऐवजी लेखी पत्राद्वारे सेवावाढ मिळणार आहे. प्रकल्पासाठी भूसंपादन केल्यानंतर केवळ प्रकल्पग्रस्त दाखला घेतलेल्या बेरोजगारांना महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यात आले. आयटीआय समकक्ष असलेल्या या योजनेत महानिर्मितीने केवळ प्रकल्पग्रस्तांची निवड केली. भविष्यात त्यांनी भरतीपूर्व परीक्षा पास होऊनच महानिर्मिती कंपनीत सेवेत दाखल व्हावे, अशी रचना केली. प्रशिक्षण संपल्याचे सांगून नियमानुसार १० मार्चला त्यांची सेवा समाप्ती होणार होती.
तथापि, अशा प्रशिक्षणार्थींच्या जीवनाचे पुढे काय? हे प्रकल्पग्रस्त उमेदवार असल्याने त्यांना मानवतावादी दृष्टीने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थींप्रमाणे परीक्षा पास होईपर्यंत कमी करु नये, त्यांची महानिर्मिती कंपनीतून हकालपट्टी करू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अखेर संघटित झालेल्या बीटीआरआय प्रशिक्षणार्थीना घेऊन पोफळीचे माजी सरपंच चंद्रकांत सुवार, प्रताप शिंदे यांनी भाजपचे नेते बाळ माने यांच्यासमोर हा विषय मांडला. तातडीने मुंबईला जाऊन माने यांच्या मध्यस्थीने ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे, महानिर्मितीचे व्यवस्थापन यांच्यासमोर ही व्यथा मांडण्यात आली. आम्हाला रोजगारापासून वंचित ठेवू नका. पात्र ठरेपर्यंत प्रशिक्षणार्थी ठेवा. मात्र, भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण ठेवा, असा सूर यावेळी पुढे आला.
यापूर्वी या कंपनीत प्रकल्पग्रस्त अनेक वर्ष कार्यरत होते. त्यांनी कौशल्यपूर्ण सेवा बजावल्याचे यावेळी सांगण्यात आले. अखेर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीला वाढ मिळाली. मात्र, लेखी आदेश दोन दिवसात पाठवतो, असे सांगण्यात आले. आज दोन दिवस ४० प्रशिक्षणार्थी आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)