सानुग्रह अनुदान, महागाई भत्ता न दिल्यास धरणे आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 05:23 PM2019-10-11T17:23:06+5:302019-10-11T17:25:42+5:30
राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालये व मध्यवर्ती कार्यालयांसमोर धरणे आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.
रत्नागिरी : राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालये व मध्यवर्ती कार्यालयांसमोर धरणे आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.
राज्य सरकारच्या तरतुदीनुसार एस.टी कर्मचाऱ्यांना जुलै २०१९ च्या वेतनापासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याचे निश्चित केले होते. मात्र, अद्यापही वाढीव भत्ता लागू करण्यात आला नाही. हा भत्ता महागाईसह दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशी मुख्य मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
दरवर्षी कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे सानुग्रह दिवाळीपूर्वी वाटप केले जाते. मात्र, यावर्षी दिवाळी तोंडावर आली असली तरी सानुग्रह देण्यात आला नाही. त्यामुळे एस. टी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सणांपूर्वी उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य करण्यात आले होते.
त्यानुसार एस.टी महामंडळाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रूपये उचल द्यावी व ऑक्टोबर महिन्याचे वेतन दि.२५ तारखेपर्यंत जमा करावे, अशा विविध मागण्या संघटनेने महामंडळाकडे करण्यात आल्या आहेत. या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात आला आहे.