नोंदणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांकडून उकळले हजारो रुपये, इस्लामपूर येथील एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:07 IST2024-09-26T16:06:34+5:302024-09-26T16:07:08+5:30
रत्नागिरी : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेच्या नोंदणीच्या बहाण्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समाेर आला आहे. याप्रकरणी ...

नोंदणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांकडून उकळले हजारो रुपये, इस्लामपूर येथील एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनेच्या नोंदणीच्या बहाण्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत समाेर आला आहे. याप्रकरणी नरेंद्र करंजुसकर (रा. इस्लामपूर, जि. सांगली) याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील कामगार सहायक आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यासाठी या विभागाच्या पाेर्टलवर बांधकाम कामगारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागते.
या मंडळाचे कार्यालय शहरातील शिवाजीनगर भागातील शिवरूद्र प्राइड या इमारतीत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी या कार्यालयात सदैव कामगारांची ये-जा असते. हे हेरून करंजुसकर याने या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आपले खासगी कार्यालय थाटले. आपले कार्यालय सहायक कामगार आयुक्त कार्यालयांतर्गत काम करत असल्याचे करंजुसकर, तसेच त्याच्या इतर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. कामगारांची अधिकृत नोंदणी व नूतनीकरण केवळ १ रुपयात होते. मात्र, करंजुसकर याने १००० ते १५०० रुपये कामगारांकडून घेतल्याचे पुढे आले आहे. याबाबत काही कामगारांनी विचारणा करता आम्हाला या कार्यालयाला पैसे द्यावे लागत असल्याने एवढे पैसे घ्यावे लागत असल्याचे कारण सांगितले.
ही बाब सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे यांच्या काही दिवसांपूर्वी लक्षात आली. त्यांनी काही कामगारांकडे याबाबत विचारणा करता, त्यांनी या खासगी कार्यालयाकडून नोंदणीसाठी भरमसाठ पैसे घेतल्याचे सांगितले. ही बाब संशयास्पद वाटत असल्याने आयरे यांनी याबाबत शहर पोलिस स्थानकाशी पत्रव्यवहार केला. शासकीय योजनेला गालबोट लागू नये, यासाठी त्यांनी तक्रार दाखल करताच गुन्हा दाखल केला आहे.
अशा घटनांमुळे शासकीय योजनेला गालबोट लागू नये, तसेच सामान्य कामगारांची फसवणूक होऊ नये, या उद्देशाने नरेंद्र करंजुसकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. - संदेश आयरे, सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी.