तात्पुरत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जादा वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:04+5:302021-04-22T04:32:04+5:30
दापोली : जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केल्या जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जादा वेतन दिले जाणार आहे. ...
दापोली : जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त केल्या जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जादा वेतन दिले जाणार आहे. बीएएमएस डॉक्टरांना शासकीय निधीमूधन २८ हजार अधिक सीएसआर निधीमधून २० हजार, एमबीबीएस डॉक्टरांना ६० हजार अधिक २० हजार, फिजिशियन डॉक्टरांना १ लाख अधिक २० हजार इतके वेतन देऊन त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दापोली येथील उपविभागीय कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना
प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी दापोली येथील उपविभागीय कार्यालयात
शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची आढावा बैठक उदय सामंत यांनी घेतली.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दापोलीचे आमदार योगेश
कदम यांनी त्यांचा १ कोटीचा निधी कोरोना प्रतिबंधक साधने खरेदी करण्यासाठी
दिला आहे. त्यातून मास्क तसेच ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात येणार
असून, जिल्हा नियोजन निधीमधून जिल्ह्यासाठी ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दापोली
उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी केंद्रामध्ये प्राणवायूचा तुटवडा भासू नये,
यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी
यावेळी दिली.
आंजर्ले येथील प्राथमिक आरोग्य
केंद्रामध्ये लसीकरण केंद्र नसल्याने या केंद्रात असलेल्या गावातील
नागरिकांना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जावे लागत आहे. त्याचा नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडत असून, वेळही वाया जात असल्याचे मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्याची दखल घेत आंजर्ले येथील प्राथमिक शालेच्या
वर्गखोल्या ताब्यात घेऊन तेथे लसीकरण केंद्र सुरू करावे, असे आदेश त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले.
तालुका
आरोग्य अधिकारी कार्यालय दापोली येथील कर्मचारी नवनाथ साळवी यांचे कर्तव्यावर
असताना २२ जुलै २०२० रोजी कोरोनाने निधन झाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण
निधीअंतर्गत कोरोनाशी लढताना आरोग्य कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांना
मिळणारी ५० लाखांची मदत अजूनही साळवी यांच्या कुटुंबियांना मिळाली नसल्याचे सामंत यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिले. आपण मंत्रालयात
पाठपुरावा करून हा निधी साळवी यांच्या कुटुंबियांना मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
दाभोळ येथील रेशन दुकान बंद केल्याने
तेथील ग्रामस्थांना ८ किलोमीटरवरील दुसऱ्या गावातील रेशन दुकानात
जाऊन धान्य खरेदी करावे लागत असल्याचे सांगितले. पुरवठा विभागात रेशन दुकानासाठी अर्ज करूनही या विभागाने नवीन दुकान सुरू करण्यासाठी परवानगी
दिली नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनी दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांना लवकरात लवकर दाभोळ येथील रेशन
दुकान सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले.
या पत्रकार
परिषदेला उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील, मुख्याधिकारी
महादेव रोडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मरकड, उपजिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश भागवत, प्रभारी पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड,
गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभापती रेश्मा
झगडे, नगराध्यक्षा परवीन शेख आदी उपस्थित होत्या.