कोरोना महामारीवर लिंबू, संत्री, मोसंब्याचा उतारा! दरही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:37+5:302021-04-07T04:32:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : संत्री, मोसंबी, लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते. या फळांच्या सरबत सेवनामुळे अशक्तपणा दूर होतो. शरीरातील शक्ती वाढविण्यास फळे फायदेशीर तर ठरतातच, शिवाय त्वचा, केस, डोळे यासाठीही फायदेशीर ठरते. कोरोना रुग्णवाढीचा धसका नागरिकांनी घेतला असून रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वपरीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे बाजारात सध्या मोसंबी, संत्री, लिंबूला सर्वाधिक मागणी होत आहे.
लिंबूवर्णिय फळांमधील अँटिबॅक्टेरियल व अॅटिऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. शिवाय पोटासंबंधी समस्यांवर गुणकारी असून मोठ्या प्रमाणावर फायबर असल्याने या फळांचा वापर प्राचीन काळापासून सुरू आहे. ‘क’ जीवनसत्त्वामुळे अनेक रोगांचे निवारण होत असल्याने प्राधान्याने या प्रकारच्या फळांना मागणी वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा धसका सामान्यांनी घेतला असल्यानेच फळांना मागणी होत आहे.
मुंबईतून आवक
रत्नागिरीत येणारी फळे ही बहुतांश वाशी मार्केट व कोल्हापूर येथून येत आहेत. संत्री, मोसंबी, लिंबू वाशी येथून येत असली तरी, कोल्हापुरातूनही लिंबाची आवक होत आहे. पुढच्या आठवड्यापासून रमजान मास सुरू होत असल्याने विक्रेत्यांनी मागणी वाढविली आहे.
थकवा दूर होण्यास मदत
संत्री, मोसंबी, लिंबू ही लिंबूवर्णिय फळे असून त्यामध्ये पॅक्टीन, ‘क’ जीवनसत्त्वाबरोबरच इतर पोषक तत्त्वे असल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करण्यासाठी मदत करतात. हृदयरोग होण्यापासून बचाव करत असल्याने यांचे सेवन फायदेशीर ठरत आहे. शिवाय वजन कमी करण्यासाठी मोसंबीचा फायदा होतो. थकवा घालवित असताना दिवसभर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी लिंबूपाणी सेवन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ताप आलेल्या रुग्णांना तरी मोसंबी ज्यूस आवर्जून दिला जातो. त्यामुळे या फळांचा विशेष खप होत आहे. कोरोना काळात तर सर्वाधिक मागणी होत आहे.
सर्दी, घसादुखी किंवा तत्सम् अॅलर्जी दूर करण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वावर भर दिला जातो. काहीवेळा ‘क’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जातात. मात्र गोळ्या खायला नको असणारे फळे खाऊन जीवनसत्त्वे मिळवितात.
- डॉ. निशिगंधा पोंक्षे
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्याच्या नादात फळे खातानाही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा योग्य मात्रा असलेली ‘क’ जीवनसत्त्वाची गोळीही फायदेशीर ठरते. आवडत असणारी फळे जरूर सेवन करावीत.
- डॉ. अनिरुध्द फडके