अतिवृष्टी झाली, तर जिल्ह्यात ३१ ठिकाणांना पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:03+5:302021-07-28T04:33:03+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात २००५ सालापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यात २००५ सालापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. काही ठिकाणी दरड कोसळणे, घरे, रस्ते, डोंगर खचणे, आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत पूरप्रवण असलेल्या ३१ ठिकाणी आणि दरडप्रवण असलेल्या ४५ ठिकाणी न जाणे, हेच सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य म्हणायला हवे.
जिल्ह्यासह महाराष्ट्रात २००५ साली अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये घरे, गोठे काेसळले, डोंगर खचले. त्यामुळे अशा संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा निर्माण झाला आणि त्याअंतर्गत अशा आपत्तींचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांच्या साहाय्याने आराखडा तयार केला गेला. रत्नागिरी जिल्ह्याचाही आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून, योग्य उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील काही गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या गावांमध्ये प्रशासनाला या कालावधीत विशेष खबरदारीच्या उपाययोजना कराव्या लागतात. निश्चित करण्यात आलेल्या धोकादायक ठिकाणांमध्ये राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, खेड आणि गुहागर या सहा तालुक्यांमध्ये ३१ पूरप्रवण गावे जाहीर करण्यात आली आहेत. या गावांमध्ये लगतच्या नद्यांना अतिवृष्टीत महापूर आल्यास या गावांमध्ये पाणी भरते. त्यामुळे या गावांमधील घरांमध्ये पाणी भरून मोठे नुकसान होते.
तसेच डोंगरी भागात जमीन खचणे, भेगा पडणे, घराला तडे जाणे, आदी प्रकार घडू लागले आहेत. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील अशी ४५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. अतिवृष्टीच्या वेळी या गावांकडे प्रशासनाची विशेष नजर असते. आपत्ती घडल्यास अशा ठिकाणी उपाययोजनेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन विशेष लक्ष ठेवून असते.
पावसाळ्यात जिल्ह्यातील धाेकादायक ठिकाणी न जाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत असतात. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी न जाणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरते.
.............................
पाणी साचण्याची कारणेजिल्ह्यातून काजळी, जगबुडी, वशिष्ठी, आदी नऊ मुख्य नद्या वाहतात.
मुसळधार पावसात या नद्यांना पूर येताे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये नुकसान होते.
काही भाग किंवा गावे सखल असल्याने पाणी या भागांत लगेचच साचते.
चिपळूणसारखे भाग खोऱ्यांमध्ये असल्याने महापूर येण्याच्या घटना घडतात.
जिल्ह्यातील पाणी साचणारी ३१ ठिकाणे
जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास राजापूर तालुक्यातील पाच, संगमेश्वर तालुक्यातील नऊ, रत्नागिरी तालुक्यातील चार, चिपळूण तालुक्यातील पाच, खेड तालुक्यातील पाच आणि गुहागर तालुक्यातील तीन ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना
दरवर्षीच या गावांमध्ये किंवा शहरातील बाजारपेठांमध्ये पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते; त्यामुळे नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या जातात. या काळात स्थलांतराची गरज वाटल्यास तसे स्थानिक प्रशासनाला कळविण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
पाऊस नको नकोसा !
गेल्या काही वर्षांत काेकणात पावसाचे प्रमाण वाढले आहे. जोडीला वादळी वारे असल्याने घरे, खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होत आहे. गेल्या एक-दोन वर्षांत तर चिपळूणसारखी ढगफुटी होत आहे. त्यामुळे हवाहवासा वाटणारा पाऊस आता नकोसा झाला आहे.
- विश्वास ढेपले, नागरिक, गुहागर
पूर्वी पाऊस म्हटले की केवढा आनंद व्हायचा! पण आता पाऊस मोठ्या प्रमाणात नासधूस करू लागला आहे. अर्थात, याला मानवजात मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली बांधकामे तसेच निसर्गाच्या विरोधात झालेली कामे यांमुळेच पाऊस धोकादायक झाला आहे.
- अर्चना सांगले, नागरिक, देवरुख