चाचणी न केल्यास दुकान मालकासह कामगारालाही दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:05+5:302021-04-16T04:31:05+5:30
मंडणगड : राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले असून, १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य ...
मंडणगड : राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलेले असून, १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य काेणत्याही कारणासाठी फिरणाऱ्यांच्या विराेधात कारवाई होणार आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांनी स्वत:ची व आपल्या कामगारांची कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास कामगारास १ हजार, तर आस्थापनेच्या मालकाकडून १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती मंडणगडचे पाेलीस निरीक्षक सुशांत वराळे यांनी दिली.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता राज्य शासनाने बुधवारी लागू केलेल्या संचारबंदीसंदर्भात तालुक्यातील जनतेला अधिकचे मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने तहसील कार्यालय मंडणगड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार मंगेश आंबेकर, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठाणकर, नगरपंचायत कर्मचारी मनोज मर्चंडे उपस्थित होते.
निवासी नायब तहसीलदार मंगेश आंबेकर यांनी नागरिकांना, घऱात राहून आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांनी, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू या लोकांना घरपोच देण्याचे आवाहन केले. तसेच तालुक्यातील म्हाप्रळ, लाटवण व बाणकोट येथील प्रवेशद्वारांवर पोलीस तपासणी नाके सक्रिय करण्यात आले असून, या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक व पोलीस यंत्रणा तपासणीकरिता सज्ज राहणार आहे. अत्य़ावश्यक सेवा वगळता तालुक्यात कोणासही प्रवेश दिला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी करूनच प्रवेश दिला जाईल. याचबरोबर म्हाप्रळ व वेसवी जंगलजेटी व्यवस्थापनास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी फेरीबोट सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ शासकीय मान्सूनपूर्व बांधकामे व विकासकामे सुरू राहतील. याकरिता संबंधीत विभागाकडून कामगारांना ओळखपत्र असणे बंधनकारक राहणार आहे. याव्यतिरिक्त खासगी व वैयक्तिक बांधकामे, विकासकामे पूर्णत: बंद राहणार आहेत. मान्सूनपूर्व शेतीची कामे मात्र सुरू राहणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी घरपोच सेवा पुरवायची आहे, तर रेस्टॉरंट, बार, व्यायामशाळा, क्रीडांगणे, उद्याने, जिम पूर्णपणे बंद राहतील. याचबरोबर चिरेखाण, क्रशर, वाळू गौणखनिज उपसा, वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. शासकीय कार्यालये पन्नास टक्के कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरू राहणार. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणतीही दुकाने सुरू ठेवल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांव्यतिरिक्त कोणासही पेट्रोल, डिझेल मिळणार नाही, अशी माहिती पाेलीस निरीक्षक वराळे यांनी दिली.