जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची फाैज तिसरी लाट रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:25 AM2021-05-30T04:25:23+5:302021-05-30T04:25:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना संभाव्य धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना संभाव्य धोका असल्याचा इशारा जागतिक आरोग्य क्षेत्रातून दिला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनानेही युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. बालके कोरोनाबाधित झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या बालरोगतज्ज्ञांची अपुरी संख्या लक्षात घेऊन अशा बालकांना कोरोना आजारातून सुरक्षित बाहेर आणण्यासाठी खासगी डाॅक्टरांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय आणि खासगी बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेली टास्क फोर्स समिती स्थापन केली आहे. जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयात बाल रुग्णांसाठी ५ टक्के ऑक्सिजन बेड तयार ठेवण्यात आले आहेत. खासगी डीसीएच, डीसीएचसी यामध्ये ५ ते १० टक्के बेड आरक्षित ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. रत्नागिरीत एस. टी. स्टँडनजीक स्वस्तिक रुग्णालय बाल कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. डाॅक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांची आवश्यक ती पदे वेगाने भरली जात आहेत.
अंगणवाडीस्तरावर अलगीकरण...
शहरी भागात आरोग्याच्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्याचा अभाव आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही तसे नियोजन केले जात आहे. बालके बाधित झाल्यास आणि त्यांचे आई-वडील निगेटिव्ह असल्यास अंगणवाडीस्तरावर अलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंगणवाडीसेविका आणि आशासेविका यांना याबाबत तसेच टेस्टिंगबाबत प्रशिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनासमाेर आव्हान
जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह तीन उपजिल्हा रुग्णालये, ११ ग्रामीण रुग्णालये, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे यापैकी जिल्हा रुग्णालयात २, ३ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये २ आणि ११ ग्रामीण रुग्णालयांमध्ये मिळून ५ असे केवळ ९ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनापुढे मोठेच आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी बालरोगतज्ज्ञांच्या सहकार्याने टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बालकांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यादृष्टीने सर्व डीसीएच, डीसीएचसी तसेच खासगी रुग्णालयांना ५ ते १० टक्के ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महिला रुग्णालयात आयसीयू कक्ष तयार ठेवला असून नव्या स्वस्तिक बाल कोविड रुग्णालयातही तयारी सुरू आहे. आवश्यक ती डाॅक्टर तसेच अन्य पदे भरण्यासंदर्भात कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक