बनावट शिधापत्रिका शोधमोहीम स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:28 AM2021-04-12T04:28:46+5:302021-04-12T04:28:46+5:30
असगोली : काेरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बनावट किंवा अपात्र असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. राज्य ...
असगोली : काेरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बनावट किंवा अपात्र असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे बनावट शिधापत्रिकांची शोधमोहीम काहीकाळ थांबणार आहे.
बनावट किंवा अपात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.
त्यानुसार राज्यात १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, काेरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी जास्तीत जास्त सरकारी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी काही काळासाठी ही मोहीम स्थगित करण्यात आली आहे.
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबतचे आदेश दिसले आहेत. या मोहिमेमध्ये बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केशरी, पांढरे आणि आस्थापना कार्ड या सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी सुरू करण्यात आली होती.
त्यानुसार प्रत्येक शिधापत्रिकाधारकांकडून अर्ज भरून घेण्यात येत होता.
त्यासोबत एक वर्षापेक्षा अधिक कालावधीचा निवासाचा पुरावा सादर करणे बंधनकारक होते.
पुराव्यांची छाननी पुरवठा विभागाकडून करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
पुरावा सादर न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,
असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.