रेल्वेत प्रवाशांचे तिकीट तपासणाऱ्या तोतया टीसीला अटक, गर्दीचा उठवत होता फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 12:18 PM2023-09-20T12:18:09+5:302023-09-20T12:18:59+5:30
प्रवाशांची तिकीट तपासताना तिकीट तपासल्याचे सांगितल्याने हा प्रकार समाेर आला
रत्नागिरी : गणेशाेत्सवासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर रेल्वेने आपल्या गावी आले आहेत. या गर्दीचा फायदा उठवून गाडीत प्रवाशांची तिकीट तपासणाऱ्या ताेतया टीसीला रेल्वे पाेलिसांनी अटक केली आहे. अंकुश तुकाराम तेलवाडे (३२, रा. जव्हार, जि. पालघर) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे स्थानक ते उक्षी रेल्वे स्थानकादरम्यान करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्यात आले आहेत. या मार्गावरील सर्वच गाड्या प्रवाशांनी फुल्ल झाल्या आहेत. या गर्दीचा फायदा उठवत अंकुश तेलवाडे ताेतया टीसी बनून प्रवास करत हाेता. ०११७२ सावंतवाडी - छत्रपती शिवाजी टर्मिनल्स ही गणपती विशेष गाडी मुंबईकडे जात हाेती. ही गाडी रत्नागिरीहून मुंबईकडे जात असताना रात्री १० ते १०:३० या कालावधीत रेल्वेचे टीसी मंगेश साळवी व प्रवीण लाेके हे तिकीट तपासत हाेते.
त्यादरम्यान त्यांना अंकुश तेलवाडे प्रवाशांचे तिकीट तपासत असल्याचे लक्षात आले. त्याने ७ प्रवाशांकडून प्रत्येकी १०० रुपयेही घेतल्याचेही लक्षात आले. काही प्रवाशांची तिकीट तपासताना त्यांनी आत्ताच तिकीट तपासल्याचे सांगितल्याने हा प्रकार समाेर आला.
त्यांनी त्वरित मागोवा घेत ताेतया टीसी अंकुश तेलवाडे याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले. त्याच्याविराेधात रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.