रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:25+5:302021-05-17T04:30:25+5:30
रत्नागिरी : तालुक्यात सायंकाळी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये झाडांची पडझड झाली, तर अनेकांच्या घरावरील पत्रे ...
रत्नागिरी : तालुक्यात सायंकाळी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये झाडांची पडझड झाली, तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले, तर किनारपट्टीवरील काही गावांमध्ये संरक्षण भिंती कोसळल्याने घरांना समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. तौउते वादळामुळे समुद्र खवळलेला हाेता़ त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिक सतर्क झाले हाेते़
रत्नागिरी तालुक्यात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली हाेती, तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात बहुतांश गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यानंतर रविवारी सायंकाळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या सकाळपासूनच राजीवडा नाका, सोमेश्वर, नाचणे सह्याद्रीनगर, मालगुंड - मराठेवाडी, भाट्येबीच या गावांमध्ये सुपारी, माड, आंब्याची झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच नाचणे सह्याद्रीनगर येथे एका रिक्षासह घरावर माड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. गावडे आंबेरे येथील बौद्ध विहारावरील तसेच उद्यमनगर येथील एका इमारतीवरील पत्रे उडाली. अनेक ठिकाणी घरावरील पत्र्यांचे छप्पर वाऱ्याने उडाल्याने घरातील सामान पावसाच्या पाण्याने भिजले.
जयगड येथील साखर मोहल्ला हा भाग किनारी असल्याने समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने घरांसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंती कोसळल्या. त्यामुळे या घरांना धोका निर्माण झाला असून, येथील रहिवासी भीतीच्या छायेत आहेत. मिऱ्या, मांडवी, भाट्ये, राजीवडा येथेही वादळाने खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा प्रचंड माऱ्याने अनेक माड, सुमारीची झाडेही जमीनदोस्त झाली. रत्नागिरी शहर परिसरात तर ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही प्रमाणात नुकसान झाले. पडझड झालेल्या ठिकाणी पाेलीस यंत्रणा स्थानिकांच्या मदतीने कोसळलेली झाडे तोडून बाजूला करून रस्ते रहदारीसाठी खुले करण्यात गुंतले होते. शहर परिसरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता, तर अनेक भागांमध्ये दुपारनंतर वीज पुरवठा ठप्प झाला होता. रात्री उशिरापर्यंत वादळ सुरूच होते.