विनाकारण घराबाहेर पडले, रुग्णालयात दाखल झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:52+5:302021-04-16T04:31:52+5:30
चिपळूण : शहरात कडक लॉकडाऊन असताना विनाकारण करणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड आणि अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय नगर परिषद व ...
चिपळूण : शहरात कडक लॉकडाऊन असताना विनाकारण करणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड आणि अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय नगर परिषद व पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे नियम मोडून फिरणाऱ्यांना अद्दल घडली. दिवसभरात ८० जणांवर कारवाईअंतर्गत त्यांची अँटिजन टेस्ट केली असता त्यामध्ये ६ जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
गुरुवारी शहरात सकाळपासून पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने या कारवाईला सुरुवात केली. बुधवारी रात्रीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्रीच्या संचारबंदीला प्रारंभ झाला. चिपळूण पोलिसांनी शहरातील सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. पोलीस शहरात आणि उपनगरात फिरून सरकारच्या लॉकडाऊनसंदर्भात जनजागृती करत होते. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना इशारा दिला जात होता. पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही जे लोक विनामास्क आणि विनाकारण फिरत होते, अशा लोकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी केली जात होती. त्यांचे नाव व मोबाइल क्रमांकही घेतले जात होते. पुन्हा तोच नागरिक विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांकडून दिला जात होता.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा पर्यायही आमच्याकडे आहे, असा इशारा पोलिसांकडून दिला जात होता.
शहरात संचारबंदी असताना, व्यावसायिकांनी दुकाने बंद असतानाही नागरिकांची वर्दळ कायम असल्याने चिपळूण शहर पोलीस आणि चिपळूण नगर परिषद प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली. शहरातील जुना बसस्थानक परिसरात मोबाइल व्हॅन उभी करून तेथेच प्रत्येकाची अँटिजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सहा जण कोरोनाबाधित होते. त्यांना तत्काळ कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या पद्धतीची कारवाई यापुढे सातत्याने सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विधाते यांनी दिली.
.................
चिपळूण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड आणि अँटिजन टेस्ट करण्यात आली.