बटाट्याच्या दरात घसरण मात्र टोमॅटोचे दरात वाढ, ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:42+5:302021-07-12T04:20:42+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या ...
रत्नागिरी : जिल्ह्यात भाजीपाला आवक परजिल्ह्यातून होत असून स्थानिक पालेभाज्यांची आवक सुरू झाली आहे. माठ, मुळा, मेथी तसेच रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कांदा-बटाट्याचे दरात घसरण झाली आहे. बटाटा शंभर रूपयास पाच किलो तर कांदा शंभर रूपयास चार किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र लसूण शंभर रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.
टोमॅटो ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून अन्य भाज्या ७० ते ८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पालेभाज्यांची जुडी १५ ते २० रूपये किलो दराने सुरू आहे. परजिल्ह्यातील शेतकरी भाज्या, कांदा-बटाटा, आंबा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. डाळी- कडधान्यांचे मात्र गगनाला भिडले असून सूर्यफूल १८० रूपये लीटर दराने विक्री सुरू आहे. महागाईने सामान्य ग्राहक मात्र पोळत आहेत. भाज्यांच्या दरावर निर्बंध लावण्याची मागणी होत आहे. श्रावणात, भाज्यांची तसे फळभाज्यांची आवक वाढण्याची शक्यता आहे. व्रतवैकल्यांच्या महिना म्हणून श्रावण ओळखला जात असल्याने भाज्यांना मागणी जास्त असल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्यांचे उत्पादन सुरू झाले असल्याने आवक सुरू झाली आहे. सकाळच्या सत्रात शहरात ग्रामीण भागातून शेतकरी भाज्या घेऊन येत असून विक्रेते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. मुळा, पालक, माठ, चवळी, मेथी आदी प्रकारच्या भाज्या विक्रीला येत असून कोथिंबीरही विक्रीला उपलब्ध आहे.
परराज्यातून आंबा बाजारात विक्रीसाठी येत असून मागणीही वाढती आहे. बदामी, लंगडा, दशहरी, बलसाड आदी प्रकारचा आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहे. १०० ते १८० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे.
बाजारात अननस मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ३० ते ४० रूपये नग दराने विक्री सुरू असून शंभर रूपयांना पाच नग दराने विक्री करण्यात येत आहे. अननसाचा हंगाम असलेल्या पिकलेल्या तसेच कच्च्या अननसासाठी विशेष मागणी होत आहे.
कांदा, बटाटा, लसणाच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाली आहे. परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून विक्रीसाठी गावोगावी हिंडत असून कमी दरात प्राप्त होत असलेल्या कांदा, बटाटा, लसणाला मागणी वाढती आहे. दर किफायतशीर असल्याने परवडत आहेत. मात्र स्थानिक बाजारात त्याच्या किमती अधिक आहेत. आठवड्याला विक्रेते येत असल्याने खरेदी सोपी होत आहे.
- अंकिता पवार, गृहिणी
महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असून जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर निर्बंध असणे गरजेचे आहे. डाळी, कडधान्यांसह भाजीपाला दरातील सातत्याने होणारी वाढ याबाबत शासनाने विचार करणे गरजेचे आहे. दररोजचा डाळभात तरी किफायतशीर दरात उपलब्ध हाेणे आवश्यक आहे. इंधनवाढीनंतर होणारी दरवाढ रोखण्याची आवश्यकता आहे.
- प्रभा देसाई, गृहिणी