फॅमिलीची फ्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:21+5:302021-06-21T04:21:21+5:30
फॅमिली किंवा कुटुंब म्हणताच तुम्हाला नवरा, बायको व एक-दोन मुले. फार तर आजी-आजोबा अशी साचेबंद संकल्पना मनात येत असेल. ...
फॅमिली किंवा कुटुंब म्हणताच तुम्हाला नवरा, बायको व एक-दोन मुले. फार तर आजी-आजोबा अशी साचेबंद संकल्पना मनात येत असेल. पण आता कुटुंब हे युनिट केवळ पारंपरिक राहिलेले नाही. प्रसिद्ध समाजसेवकांचेही परिवार आहेत. अण्णा हजारे हे ज्येष्ठ समाज कार्यकर्ते बॅचलर म्हणजे अविवाहित आहेत. पण मी अण्णा हजारे असे अण्णांचे नाव सांगणारा केवढा तरी मोठा शिष्य परिवार हजारेंनी निर्माण केला. लेखकाचा एक वाचक परिवार असतो. त्यातून स्नेह आणि सुसंवाद निर्माण होतो. अगदी निकेत पावसकरसारखे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझे रसिक, वाचक भेटायला आले की, मला फार आनंद व्हायचा. कणकवली दापोलीशी हस्तांदोलन करायची. माझे शेकडो वाचक हा व्यापक अर्थाने माझा परिवारच आहे व ही ‘फ्रेम’ आता इतकी मोठी झाली आहे की, विचारुच नका. शिक्षक म्हणजे गुरु आणि त्यांचे विद्यार्थी ही पुन्हा एक वेगळी फॅमिली.
समान विचार, तत्व जपणाऱ्या स्नेहींचा पाठिंबा गट माझ्या फॅमिलीचाच एक भाग आहे. थेट ‘चाविका’च्या जुन्या परंपरेशी नातं सांगणारे आम्ही नास्तिक मित्र एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी असतो. आजकाल तरुण व तरुणी एकत्र राहते तेव्हा वेगळ्या अर्थाने ती फॅमिलीच असते. म्हणजे कुटुंबाची ‘फ्रेम’ बदलत आहे. एखादा बरीच वर्षे रुळलेला पाळीव प्राणीसुद्धा त्या फ्रेममध्ये सहभागी असतो. माझा एक पत्रकार मित्र त्याचा पाळीव श्वान मेला, तेव्हा ‘आमचा श्वान वारला’, असे म्हणाला. म्हणजे त्याच्यादृष्टीने तो डाॅगी माणसाइतका महत्त्वाचा होता. त्याचा लळा लागला होता. गोतावळ्यातलाच होता तो. एकाच घराला धरुन राहिलेले स्वचंपाकी पूर्वी त्या कुटुंबातील फॅमिली मेंबरच होऊन जायचे. कुणी सांगावे? एखादा यंंत्रमानवही भविष्यात आपल्या घराची सेवा करत आपला होऊन बसेल.
रोब्या, आज तुला बरं वाटत नाही का? असं मी रोबोटला विचारेन. जे आज अशक्य वाटते, ते नंतर वास्तवात येते. एकत्र कुटुंबाला आता पुन्हा नव्याने काही स्पेस मिळेल, हे संभवत नाही. ब्रह्मचारी माणसालाही आता एकटेपणा यायचे काही कारण नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या परिवारात किंवा सामाजिक संस्थेच्या उपक्रमात तो सहज सहभागी होऊ शकतो. हेच लोकशाहीचे सामर्थ्य व साैंदर्य आहे. भविष्यकाळात समलैंगिक कुटुंबात दोन जोडीदार पार्टनर आणि त्यांचे एखादे दत्तक मूल अशी रचनाही दिसेल. कोरोनानंतरचे जग हीच एक सत्य नवलकथा ठरणार आहे.