घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2016 11:39 PM2016-05-03T23:39:19+5:302016-05-03T23:39:19+5:30

जयेंद्र राऊत : अनेकांनी दिली ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमा; तरीही दिले मुलांना चांगले शिक्षण

The family is ready to visit the house again! | घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

घरोघरी फिरुनच सांभाळतो कुटुंबाचा डोलारा !

Next

आवाशी : फुगे विकून मी कसेबसे सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे जमले नाही. मात्र, तेव्हापासूनच लोकांच्या घरोघरी फिरून विविध वस्तूंच्या विक्रीतून उदरनिर्वाह करणे हे आपल्या नशिबी आले व पुढे तोच आपला प्रमुख व्यवसाय झाला. या व्यवसायाला न्याय देत आज तब्बल ३८ वर्षे हे काम आपण मनापासून करत असून, संपूर्ण कुटुंबाचा डोलारा आपण याच कामातून सांभाळत असल्याचा अभिमान वाटतो, असे वयाच्या ५६ व्या वर्षीही गावोगावी वस्तू विक्री करणारे जयेंद्र राऊत सांगतात.
जयेंद्र महादेव राऊत हे खेड तालुक्यातील आवाशी गावातील (मधलीवाडी) गृहस्थ. तीन वर्षांपूर्वी ते मुंबई सोडून पत्नी सविता सोबत गावी आले. गावी आल्यापासून राऊत हे सकाळी ९ वाजले की, काखेला जुन्या पद्धतीची झोळी लावून घराबाहेर पडतात. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ‘ओम नम: शिवाय’ असा नमस्कार घालणे कधीही चुकवत नाहीत. जुन्या पद्धतीची झोळी लावून गावोगावी फिरणाऱ्या राऊतांना अनेकांनी ‘झोळीवाले राऊत’ अशी उपमाही दिली आहे. त्यांच्या या फिरत्या व्यवसायाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा जीवनपटच समोर आला.
जयेंद्र राऊत हे मूळ जरी आवाशी गावचे असले, तरी त्यांचे बालपण व तरुणपण हे मुंबईतील मालाड येथे गेले. ते दीड वर्षाचे असताना त्यांच्यावरील आईचे छत्र हरपले. त्यानंतर वडिलांनीच त्यांचा सांभाळ केला. ७ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांनी फुगे विकून पूर्ण केले. त्यामुळे त्यांना मुंबईतच पडेल ते काम करण्याची सवय लागली. वयाच्या अठराव्या वर्षी मुंबईत त्यांना एका माणसाने ‘इमिटेशन ज्वेलरी’च्या कारखान्यात कामाला ठेवले. या कारखान्यात काम करण्याआधी त्यांनी मच्छी विकणे, भाजी विकणे अशी कामेदेखील केली. या कारखान्यामध्ये बनविलेले बेन्टेक्सचे दागिने घरोघरी जावून विकण्याचे काम जयेंद्र हे करत असत. याचबरोबर विविध प्रकारचे कपडे, अगरबत्ती यांचीही विक्री ते याच्या जोडीने करत असत.
याच व्यवसायावर त्यांनी आपला उदरनिर्वाह चालू केला. वडील गेल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी लग्न केले. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते याच व्यवसायावर भागवत असत. याच व्यवसायाच्या आधारे त्यांनी आपल्या मुलाला पदवीधर तर मुलीला १२ वीपर्यंत शिक्षण दिले. आज त्यांची दोन्ही मुले विवाहित असून, नोकरी करत आहेत. मात्र, राऊत यांना लागलेली या व्यवसायातील गोडी ही गावी आल्यानंतरही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर गावातच त्यांनी इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचा कारखाना सुरु केला. ते येथे पत्नीच्या मदतीने वेगवेगळे दागिने बनवतात. हे दागिने आजही ते पायी प्रवास करून घरोघरी जावून विकतात. आजही त्यांनी आपला जुना व्यवसाय थांबविलेला नाही. आजही त्यांचा हा दिनक्रम सुरूच आहे. (वार्ताहर)

‘‘मी दीड वर्षाचा असताना माझी आई हे जग सोडून गेली. मला आईला पाहिलेले नीटसे आठवत देखील नाही. तेव्हापासून वडिलांच्या मायेखाली वाढलो. आम्ही एकूण तीन भावंडे, तेव्हाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. वयाच्या ११ व्या वर्षी मी मुंबईत फुगे विकायचो. त्यावेळी मी इयत्ता ५ वीत शिकत होतो. बालडोंगरी प्राथमिक शाळा, मालाड येथे ७ वीपर्यंत शिक्षण घेतले. ७ वीपर्यंत शिकत असताना मी फुगे विकायचो. घरोघरी जावून वस्तू विकून उदरनिर्वाह करण्याचेच आपल्या नशिबी असल्याने आपण ती स्वीकारले.’’

Web Title: The family is ready to visit the house again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.