नमनामध्ये सहभाग न घेतल्याने कुटुंब वाळीत
By admin | Published: September 9, 2014 11:39 PM2014-09-09T23:39:46+5:302014-09-09T23:45:20+5:30
पोलिसात तक्रार : संगमेश्वर तालुक्यातील कसबा देवपाटवाडीतील प्रकार उघडकीस
रत्नागिरी : इंटरनेट तथा मोबाईलमुळे अवघे जग समीप आले आहे. वैज्ञानिक युगात जगत असतानादेखील केवळ क्षुल्लक कारणास्तव एखादे कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. कसबा देवपाटवाडीतील संतोष चांदे या कुटुंबीयाला वाडीने गेली दीड वर्षे वाळीत टाकल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील तंटामुक्त समिती तसेच संगमेश्वर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवूनसुध्दा न्याय न मिळाल्याने चांदे कुटुंबीय मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे.
संतोष चांदे (कसबा देवपाट) येथील रहिवासी आहेत. वाडीतील घरपट माणसाने नमनामध्ये सहभागी होणे हा नियम आहे. परंतु चांदे यांना त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव नमनामध्ये सहभागी होता येत नाही. नमनामध्ये सहभागी न होणाऱ्या कुटुंबाला एक हजार रूपयाचे दंडाची रक्कम भरावी लागते. चांदे यांनी संबंधित दंडाची रक्कम भरली आहे. असे असतानादेखील वाडीने चांदे यांचे कुटुंब वाळीत टाकले आहे.
संतोष चांदे यांना तीन वर्षाचा मुलगा आहे. सुयोग चांदे सध्या अंगणवाडीमध्ये शिकत आहे. चांदे कुटुंबियाशी कोण बोलेल किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवेल त्याला देवाजवळ गाऱ्हाणे घालून शिक्षा व्हावी, असा वाडीने नारळ दिला आहे. त्यामुळे वाडीतील एकही ग्रामस्थ चांदे कुटुंबियांशी बोलत नाही. इतकेच नव्हे तर सुयोग याच्याशी अंगणवाडीतील मुले, मुली बोलत नाहीत. त्यामुळे बालमनावर त्याचा परिणाम होत आहे.
कामाच्या व्यापामुळे नमनात सहभागी होता येत नसल्याचा अर्ज देऊन दंडाची रक्कम भरली होती. तरीही चांदे व त्यांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकल्याबद्दल महिला व मुलांसाठी सहायता कक्ष, रत्नागिरी यांच्याकडेही तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यावर संगमेश्वर पोलीस स्थानकात सहाय्यता कक्षाने पत्र पाठवून पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांना गावपातळीवर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याबाबत सूचना करण्यात आली होती. तेव्हा पोलीसपाटील व तंटामुक्त समिती अध्यक्षांनी हे प्रकरण गावात मिटिंग घेऊन मिटवितो, असे सांगितले होते. मात्र, याबाबत त्यांनी मिटिंग बोलावलेली नाही, शिवाय कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
चांदे यांचा पुतण्या दहावीत शिकत आहे. पुतण्यासही काकाबरोबर बोलण्यास मज्जाव करण्यात आला. तो काकाशी बोलतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयासही वाळीत टाकण्यात आले आहे. वाडीच्या या कारभाराला कंटाळलेल्या चांदे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करणार असल्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)
तंटामुक्त समितीकडेही केली तक्रार.
पोलिसात तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याने संताप.
पोलीस अधीक्षकांना देणार निवेदन.