प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा चिरेबंदी वाडा पोरका झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:56 PM2023-08-03T15:56:00+5:302023-08-03T15:57:35+5:30
गणेश उत्सव, शिमगा उत्सव या दोन सणासाठी ते आवर्जून आपल्या गावात येत
शिवाजी गोरे
दापोली : कोकणाबाहेर गेलेल्या प्रत्येक कोकणी माणसाला आपल्या गावात एखादं टुमदार घर बांधण्याचं स्वप्न असतं. आयुष्यभर भव्यदिव्य स्वप्न पाहिलेल्या आणि ती सत्यात उतरवलेल्या नितीन देसाई यांनीही असं स्वप्न पाहिलं आणि आपल्या मूळ गावी, दापोली तालुक्यातील पाचवली येथे चिरेबंदी वाडा बांधला. त्याचं हे स्वप्न तर पुर्ण झालं. पण आपल्या गावात एक स्टुडिओ उभारण्याचं मात्र राहूनच गेलं. आता त्यांच्या अचानक आणि धक्कादायक मृत्यूनंतर ग्रामस्थ त्यांच्या आठवणींनी शोकाकुल झाले आहेत.
कलादिग्दर्शन रक्तातच भिनले असल्याने देसाई यांनी आपले पाचवलीतील घरही देखण्या पद्धतीने उभारले. आंगण , पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाक खोली, बेडरूम, पोट माळा, पडवीत बसण्याची व्यवस्था, तसेच कोकणी पद्धतीची चूल अशी घराची रचना असलेले कोकणी पद्धतीचे जाब्या दगडांनी बांधलेले लाकडी, फळ्या, लाकडी खांब, लाकडी जिना, असा कोकणी पद्धतीचा वाडा चिरेबंदी त्यांनी बांधला होता. या घरात दिवांत क्षण घालवण्यासाठी ते येत असत. जून महिन्यात शेवटचं ते याच घरात येऊन राहून गेले मात्र त्यांची ही शेवटचीच आठवण ठरली.
कोकणातील उत्सव म्हणजे गणेश उत्सव, शिमगा उत्सव या दोन सणासाठी ते आवर्जून आपल्या गावात येत असतात त्यावेळी दोन-तीन दिवस आपल्या स्वप्नातील घरात म्हणजेच वाडा चिरेबंदी राहत असत. आजोबा, वडील, काका, भाऊ, आणि मुले चार पिढ्या एकत्र कुटुंब पद्धती प्रमाणे देसाई मंडळी एकत्रच सण उत्सव साजरे करत.
वडील नोकरी निमित्त मुंबईत असल्याने त्यांचे वास्तव्य मुंबईत होते तरीही त्यांनी गावाची नाळ जुळवून ठेवली होती. आपल्या गावात कोकणी पद्धतीचा वाडा असावा, सुंदर मंदिर असावं असं त्यांचं स्वप्न होतं गावात मारुतीचं सुंदर मंदिर त्यांनी उभं केलं, कोकणी पद्धतीचा वाडा चिरेबंदी उभा केला. गावदेवीच्या मंदिराच्या कामालाही सुरुवात झाली, मात्र आपल्या गावात एक स्टुडिओ असावा असे त्यांचे स्वप्न होते हे स्वप्न मात्र अधुरे राहिले.