राजेंद्र बिर्जे यांना जिल्हा प्रशासनातर्फे निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:30+5:302021-04-06T04:30:30+5:30
फोटो मजकूर महसूल विभागात गेली ३९ वर्षे सर्वोत्तम प्रशासकीय कामकाज सांभाळणारे तहसीलदार राजेंद्र बिर्जे बुधवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त अप्पर ...
फोटो मजकूर
महसूल विभागात गेली ३९ वर्षे सर्वोत्तम प्रशासकीय कामकाज सांभाळणारे तहसीलदार राजेंद्र बिर्जे बुधवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या हस्ते गौरव करून त्यांना निरोप देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महसूल विभागात गेली ३९ वर्षे सर्वोत्तम प्रशासकीय कामकाज सांभाळणारे तहसीलदार राजेंद्र चंद्रकांत बिर्जे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या हस्ते बिर्जे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वडिलांच्या अकाली निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सन १९८१ साली राजेंद्र बिर्जे महसूल विभागात लिपिक या पदावर रुजू झाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत त्यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांच्या हस्ते कोकण विभागातील सर्वोत्तम मंडल अधिकारी या पुरस्काराने राजेंद्र बिर्जे यांचा सन्मान करण्यात आला होता.
धाकट्या मुलाच्या अपघाती निधनाने राजेंद्र बिर्जे खचून गेले होते. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी, आदींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे या दुःखातून सावरून राजेंद्र बिर्जे पुन्हा कामावर रुजू झाले. लिपिक ते तहसीलदार या पदावर काम करताना राजेंद्र बिर्जे यांनी सर्वोत्तम प्रशासकीय कामकाजावर भर दिला होता. आपल्या अनुभवाचा उपयोग ते आपल्या प्रशासकीय कामासाठी उत्तम प्रकारे करीत होते.
ते मार्चअखेर सेवानिवृत्त झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध विभागांतील अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. महसूल विभागाने केलेल्या सत्काराप्रती राजेंद्र बिर्जे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.