शेतकरी नवरा नकाे गं बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:30 AM2021-03-21T04:30:06+5:302021-03-21T04:30:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुलींची शिक्षणाची जिद्द असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराबाबतच्या ...

Farmer husband nakae gam bai! | शेतकरी नवरा नकाे गं बाई!

शेतकरी नवरा नकाे गं बाई!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुलींची शिक्षणाची जिद्द असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आयुष्याच्या जोडीदाराबाबतच्या त्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. डाॅक्टर्स, इंजिनिअर यांना प्राधान्य देतानाच शासकीय नोकरदार असलेल्यांनाही पसंती असते. मात्र, शेतकरी घराण्यातील उच्चशिक्षित मुलगा असला तरीही त्याला अगदी ९९ टक्के मुलींकडून नाकारले जात असल्याचे अनुभव अनेक वधू-वर सूचक मंडळांनी सांगितले.

आताच्या पिढीत मुलांच्या बरोबरीने मुलींना शिक्षणात, नोकरीत समान संधी मिळू लागली आहे. काही वेळा मुलीचे शिक्षण मुलापेक्षा अधिक असल्याचीही उदाहरणे अनेक आहेत. उच्च शिक्षण घेतल्याने मुलींचे विचार स्वतंत्र झाले आहेत. त्यामुळे जोडीदार निवडताना डाॅक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक यांना प्राधान्य दिले जात आहे. काही मुली उच्च पदस्थ नोकरदार किंवा आर्थिक स्थैर्य असलेला उद्योजक यांची निवड करतात. मात्र, शेती भरपूर आहे, बागायतदार आहे, उच्च शिक्षित आहे, अशा शेतकरी घरातील मुलाला मुलींकडून सर्रास नाकारले जात आहे.

विशेषत: मुलीच्या आई-वडिलांच्याच भावी जावयाबद्दलच्या अपेक्षा जास्त असतात. त्यामुळे शेतकरी मुलगा मुलीपेक्षा तिच्या आई-वडिलांकडून नाकारला जात असल्याचे या मंडळांनी सांगितले.

अटी मान्य असतील तरच बाेला...

मुली जोडीदाराबाबत फारशी तडजोड करत नाहीत. शिक्षण, त्याचबरोबर गलेलठ्ठ पगाराची शासकीय नोकरी हवी. व्यवसाय असला तरीही तो अधिक उत्पन्न देणारा हवा, अशी अपेक्षा नोकरी नसलेल्या मुलींचीही असते. आर्थिक स्थैर्य मिळण्याच्या दृष्टीने मुलींची तसेच तिच्या आई-वडिलांची अपेक्षा असते. नोकरी करणाऱ्या मुलीला आपल्यापेक्षा शिक्षणाने कमी तसेच पगार कमी असलेला मुलगा नको असतो. शेतकरी मुलगा तर नकोच. त्याचबरोबर छोटे कुटुंब हवे, मुलाचे स्वत:चे घर किंवा बंगला हवा, तो मुंबई, पुणे, आदी शहरांमध्ये राहणारा असावा. त्याचे गावालाही घर असावे, अशी अपेक्षा काही मुलींची असते. मुलांपेक्षा मुलीच तडजोड करण्यास तयार नसतात, अशी अनेक उदाहरणे आहेत.

सर्वाधिक मागणी डाॅक्टर, इंजिनिअर यांना...

हल्ली डाॅक्टर, इंजिनिअर झालेल्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा मुलींची अपेक्षा आपला नवराही डाॅक्टर किंवा इंजिनिअर असावा, अशी असते. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबत फारशी तडजोड केली जात नाही.

सातवी शिकलेल्या मुलींचीही आता शासकीय नोकरी करणारा नवरा हवा, अशी अपेक्षा असते; पण त्याचा पगारही किमान ३० हजार हवा आणि स्वत:चे घर असावे, अशी अपेक्षा असते. त्याचबरोबर आता एकत्र क़ुटुंबात राहण्याची तयारी असलेल्या मुलींची संख्या कमी आहे.

n आपली मुलगी लग्नानंतर सुखात राहावी, यासाठी तिचे आई-वडील चोखंदळपणे जावईशोध करत असतात. मुलगा आर्थिकदृष्ट्या कायमस्वरूपी स्थिर असावा, यादृष्टीने त्याची नोकरी कायमस्वरूपी असावी किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न निश्चित असावे, यासाठी ते आग्रही असतात.

हल्ली मुलींना गलेलठ्ठ पगार, सरकारी नोकरी असलेला किंवा डाॅक्टर, इंजिनिअर असलेला नवरा हवा असतो. काही तर एम.एस्सी., एम.काॅम. झालेल्यांनाही नाकारतात.

- प्रसन्ना कांबळी

प्रसन्न वधू-वर सूचक मंडळ, रत्नागिरी

शेतकरी मुलांना मुली सर्रास नाकारतात. हल्ली प्राधान्य मुलाच्या शासकीय नोकरीला असते. नोकरीही मोठ्या शहरांमध्ये असलेली असावी. छोटे कुटुंब असावे, अशी अपेक्षा बहुतांश मुलींची असते.

- राजेश सुर्वे, कोकण विवाह संस्था रत्नागिरी

मुलीचे आई-वडील नोकरदार असतील तर त्यांना २० हजारांची शासकीय चाकरी करणारा मुलगा जावई चालतो; पण ६० हजारांचे उत्पन्न असलेला बागायतदार मुलगा मुलीसाठी नको असतो.

- संतोष तावडे, क्षत्रिय मराठा मंडळ वधू-वर सूचक केंद्र, रत्नागिरी

मुलीचे लग्नानंतर आयुष्य सुखी जावे, अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यामुळे मुलगी शिकलेली असेल तर तिच्या तोलामोलाचा नवरा मिळावा, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते. मुलीला ती ज्या क्षेत्रात काम करते, त्याच क्षेत्रातील नवरा असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे.

- विश्वास तेरेदेसाई, रत्नागिरी

मुलगा बी. ए. आहे. शेती करतानाच तो ट्रॅव्हलर्सचा व्यवसाय करतो. मात्र, शेतकरी घरातील आहे म्हणून अगदी दहावी-बारावी झालेल्या मुलींकडून नकार आला आहे. मुलींनी केवळ नोकरी, पैसा बघण्यापेक्षा कष्ट करणारी, होतकरू मुलेही निवडायला हवीत.

Web Title: Farmer husband nakae gam bai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.