लोटेतील म्हशींच्या मृत्यूप्रकरणी शेतकऱ्याची पोलिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:19+5:302021-06-11T04:22:19+5:30
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील शेतकऱ्याच्या म्हशींचा मृत्यू झाल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात शेतकरी यशवंत गंगाराम आखाडे यांनी तक्रारी ...
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील शेतकऱ्याच्या म्हशींचा मृत्यू झाल्याप्रकरणी खेड पोलीस स्थानकात शेतकरी यशवंत गंगाराम आखाडे यांनी तक्रारी दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ७ जून राेजी घडली हाेती.
यशवंत गंगाराम आखाडे (५३, रा. लोटे तलारीवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलिसात याविषयीची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ७ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मालकीच्या दहा म्हशी घेऊन लोटे औद्योगिक वसाहत परिसरात मोकळ्या जागेत चरायला घेऊन गेले होते. घर जवळच असल्याने दुपारी १च्या सुमारास म्हशींना मोकळ्या जागेत ठेवून ते जेवण्यासाठी व आराम करण्यासाठी घरी निघून गेले. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वाडीतील रमेश रामचंद्र माने यांनी त्यांना म्हशी या गुणदे फाट्याजवळील घरडा कंपनीच्या प्लॉटमध्ये आहेत, असे सांगितले. यानंतर आखाडे हे तातडीने गुणदे फाट्याजवळील घरडा कंपनीच्या प्लॉटमध्ये आले असता, त्यांना तेथे म्हशी तडफडत असल्याचे दिसले. त्याठिकाणी दहापैकी फक्त सहा म्हशी त्यांना दिसल्या. पशुवैद्यकीय अधिकारी, लोटे यांना त्यांनी तातडीने तेथे बोलावले. मात्र, ते पोहोचण्यापूर्वी एक म्हैस सांडपाण्याच्या नाल्यात मरण पावली होती. त्यानंतर काही वेळातच अन्य दोन म्हशींचाही मृत्यू झाला. या तीनही म्हशी कोणत्यातरी अज्ञात कंपनीचे सांडपाणी पिऊन मेल्याचा संशय आखाडे यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.