पाच दिवसात २ हजार ७९७ शेतकऱ्यांचे अर्ज
By admin | Published: May 27, 2016 10:41 PM2016-05-27T22:41:42+5:302016-05-27T23:23:44+5:30
रत्नागिरी तहसील : खरीप पीक कर्जाचे परिपूर्ण प्रस्ताव
रत्नागिरी : खरीप पीक कर्ज वाटप अभियानाने रत्नागिरी तालुक्यात चांगलीच गती घेतली असून, आजपर्यंत अवघ्या पाच दिवसांत २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव विविध बँकांकडे सादर करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिली. सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक झाली.
जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी नियोजन केल्यानुसार तालुकास्तरीय समितीचे काम सुरू झाले आहे. त्याकरिता १८ मे रोजी तालुकास्तरीय समितीतील सर्व सदस्यांची सभा घेण्यात आली. यावेळी तहसीलदार सुकटे यांनी या अभियानांतर्गत संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याचे निर्देश सर्वांना दिले. १९ रोजी या अभियानासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात कृषी सहायक, कृषीसेवक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व विविध सेवा सहकारी सोसायटीचे सचिव अशा १०८ जणांची क्षेत्रिय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर २० व २३ रोजी आढावा बैठका घेण्यात आल्या.
गुरूवारी पुन्हा या अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी तालुकास्तरीय समितीची आढावा बैठक बोलावली. यावेळी विविध राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील २७९७ शेतकऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव बँकांकडे सादर करण्यात आले. केवळ पाच दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेला भरघोस प्रतिसाद दिला. अर्ज सादर करण्यासाठी असलेली २३ मेपर्यंतची मुदत जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मेपर्यंत वाढवून दिली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न बँकांकडून व्हावा, असे आवाहन तहसीदार सुकटे यांनी याप्रसंगी केले.
सध्या क्षेत्रिय अधिकारी शेतकऱ्यांमध्ये खरीप पीक कर्ज योजनेसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती करीत आहेत. तलाठ्यांना या योजनेसाठी मोफत सातबारा देण्याच्या सूचना तहसीलदार मच्छिंद्र सुकटे यांनी दिल्या आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत आता ३० मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
कामात सुसूत्रता : जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांचे नियोजन
नूतन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागातील कामांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. शासकीय कार्यालयाचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, या हेतूने त्यांनी प्रत्येक विभागात सुसूत्रता आणण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार त्यांनी कामांचे नियोजनही केले आहे.