म्हाडाविरोधात शेतकरी न्यायालयात, चिपळूण प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:15 PM2018-10-04T16:15:17+5:302018-10-04T16:18:40+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनधारकांना जो मोबदला देण्यात आला आहे, त्या निकषावर आम्हाला मोबदला मिळाला तरच प्रकल्पासाठी सहकार्य करु. अन्यथा न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा म्हाडाच्या चिपळूण प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला.
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीनधारकांना जो मोबदला देण्यात आला आहे, त्या निकषावर आम्हाला मोबदला मिळाला तरच प्रकल्पासाठी सहकार्य करु. अन्यथा न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा म्हाडाच्या चिपळूण प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला.
म्हाडाच्या प्रकल्पासाठी जमीन देणारे शेतकरी प्रभाकर पवार म्हणाले की, म्हाडाच्या चिपळुणातील प्रकल्पाला चालना देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीत बैठकीचे आयोजन केल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. मात्र, बैठकीपूर्वी आम्हाला विश्रामगृहावर बोलविण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या बैठकीत तुम्ही काहीही प्रश्न विचारु नका. १९९६मध्ये ठरलेला फॉर्म्युला मान्य असल्याचे सांगा, असे सांगण्यात आले. आम्ही त्याला नकार दिला. तेव्हा आम्हाला धमकी देण्यात आली. मी स्थानिक असल्यामुळे तुमचा विचार करतोय, नाहीतर विदर्भात शंभर टक्के जागा घेतली जाते. तुमचीही शंभर टक्के जागा घेऊ, अशी धमकी आम्हाला देण्यात आली.
यावेळी मकरंद पवार म्हणाले की, आम्हाला १९९६मध्ये ठरलेला ६०-४०चा फॉर्म्युला मंजूर आहे. परंतु, मुंबई-गोवा महामार्गासाठी जी जागा संपादित होणार आहे, त्या जागेचे पैसे तरी आम्हाला शंभर टक्के द्या. मात्र, म्हाडा त्यातही ६० टक्के पैसे घेऊन आम्हाला ४० टक्के देत आहे व ते आम्हाला अमान्य आहे.
वस्तुस्थिती सांगणार
चिपळूण शहरातील शेतकऱ्यांची म्हाडाकडून फसवणूक होत असेल तर ती कदापि सहन केली जाणार नाही. मी प्रथम म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणार आहे, असे नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी सांगितले.