सर्व्हर डाऊनमुळे फळपिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित, रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा संख्या घटली
By मेहरून नाकाडे | Published: December 1, 2023 05:38 PM2023-12-01T17:38:11+5:302023-12-01T17:38:46+5:30
३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती
रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळावी या उद्देश्याने जिल्ह्यात फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि.३० नोव्हेंबर अंतिम तारीख होती. शेवटच्या तारखेला सर्व्हर डाऊन असल्याने फळपिक विमा योजनेतील सहभागापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यातून एकूण ३० हजार २५१ शेतकरी फळपिक विमा योजनेत सहभागी झाले असून गतवर्षीपेक्षा दोन हजारने संख्या घटली आहे. त्यामुळे फळपिक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होत आहे. पिकासाठी केलेला खर्चही निघत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा काजू पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एेश्चिक आहे. दि.३० नोव्हेंबर पर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली होती.
मात्र गेल्या आठवड्यात सर्व्हरची समस्या असल्याने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अडसर येत होता. शेवटच्या दिवशी तर सर्व्हरने चांगलाच दगा दिला. त्यामुळे गतवर्षीच्या संख्येइतकीही संख्या होऊ शकली नाही. गतवर्षी ३२ हजार शेतकरी फळपिक विमा योजनेत सहभागी झाले होते. यावर्षी मात्र ३० हजार २५१ शेतकऱ्यांचा सहभाग राहिला आहे.