काेराेनाला आव्हान देत शेतकरी गुंतले शेतीच्या कामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:05+5:302021-06-16T04:43:05+5:30
राजापूर : गेल्या दोन महिन्यापासून थैमान घातलेल्या कोरोनाला जणूकाही आव्हान करीत शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये गुंतला आहे. कोरोनाच्या ...
राजापूर : गेल्या दोन महिन्यापासून थैमान घातलेल्या कोरोनाला जणूकाही आव्हान करीत शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये गुंतला आहे. कोरोनाच्या भीतियुक्त वातावरणातही शेतशिवार गेल्या काही दिवसांपासून गजबजू लागली आहेत. त्यामध्ये कोरोनाच्या भीतीने गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून तोंडाला मास्क बांधून दहशतीखाली फिरणारा जगाचा पोशिंदा शेतकरी ‘ना कोरोनाची भीती ना निसर्गाची’ अशा स्थितीमध्ये शेतामध्ये बिनधास्तपणे वावरताना दिसत आहे.
तौक्ते वादळामध्ये जोरदारपणे पडलेल्या पावसामध्ये ओल्या झालेल्या शेतजमिनीचा फायदा उचलत शेतकऱ्यांनी जमीन नांगरणी करीत बियाणे पेरणीला सुरुवात केली आहे. त्यातून तालुक्यातील सुमारे ६० टक्के बियाणे पेरणी पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सार्वजनिक ठिकाणी फिरण्यापेक्षा घरामध्ये राहणे अनेकांनी पसंत केले. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी आलेले तौक्ते वादळ आणि त्यानंतर, पावसाने राखलेल्या सातत्यामध्ये शेतकरी शेताच्या बांधावर जाऊ लागला आहे. एका बाजूला मनामध्ये कोरोनाची भीती, तर दुसऱ्या बाजूला शेती केली नाही, तर नेमके खायचे काय? याची विवंचना. अशा स्थितीमध्ये कोरोनालाच थेट आव्हान देत, गावागावांमधील शेतशिवार गजबजू लागली आहे. जगाचा पोशिंदा बिनधास्तपणे शेतीच्या मशागतीची कामे करत आहे.