शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:48+5:302021-08-26T04:33:48+5:30
देवरुख : काही दिवसांपूर्वी पावसाच्या अधुनमधून पडणाऱ्या सरींमुळे पिकाला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पिकेही तरारुन आली होती. ...
देवरुख : काही दिवसांपूर्वी पावसाच्या अधुनमधून पडणाऱ्या सरींमुळे पिकाला पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पिकेही तरारुन आली होती. परंतु आता पुन्हा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. उन्हाचा कडाका सुरू झाला आहे. पाऊस पूर्णपणे गेला, तर पिकाला धोका निर्माण होईल, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
कलमांचे प्रात्यक्षिक
दापोली : दापोली कृषी महाविद्यालयाच्या कृषी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांसाठी फळझाडांना कलम करण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. कृषी कन्या पूजा गिम्हवणेकर हिने या कार्यक्रमांतर्गत अंतर्गत फळपिकाची आंबा कोय कलम प्रात्यक्षिकाबाबत मार्गदर्शन केले.
कथालेखन स्पर्धा
देवरुख : स्व. ल. वा. साने गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कथेसाठी किमान १२०० ते १५०० शब्दमर्यादा आहे. ३१ ऑगस्टपर्यंत कथा वाचनालयात ग्रंथपाल यांच्याकडे आणून द्यावी, असे कळविण्यात आले आहे.
अखेर कामाला प्रारंभ
रत्नागिरी : मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील विविध दुरुस्तीच्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. २ कोटी ४४ लाख ७७ हजार २२५ रुपये खर्चाचे हे काम असून, या कामाचा कार्यारंभ आदेश नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. स्टेडियमची जिर्ण संरक्षक भिंत काढून नवीन उभारली जाणार आहे.
कडधान्य महागली
रत्नागिरी : शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकारची कडधान्ये महाग झाली आहेत. ही सर्व कडधान्ये बाहेरुन आयात केली जातात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर याचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने कडधान्यांचे दरही भरमसाठ वाढले आहेत. त्या तुलनेने भाज्यांचे दर मात्र घसरले आहेत.