शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर करून उत्पन्न वाढवावे : मनोज गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:37+5:302021-05-21T04:32:37+5:30
अडरे : शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात व असंतुलित केला जातो़ त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार ...
अडरे : शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात व असंतुलित केला जातो़ त्यामुळे आवश्यक त्या प्रमाणात किंवा शिफारशीनुसार खत मात्रा पिकांना उपलब्ध होत नाही़ परिणामी पीक उत्पादन खर्चात वाढ होते़ हिरवळीची खते, भाताचा कोंडा व गिरीपुष्पपाला, शेणखत, जैविक खतांचा वापर करून उत्पन्न वाढवावे, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी केले. चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन जागृती मोहिमेअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता पातळी टिकवून पिकास आवश्यक अन्नद्रव्याचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात केला जातो. रासायनिक खताचा संतुलित वापर केल्यास शेतकरी निश्चितच करत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळेस न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी.
तसेच घरचे बियाणे वापरताना उगवण क्षमता चाचणी, ३ टक्के मिठाच्या द्रावणाच्या पाण्याची बीजप्रक्रिया, जैविक खताची बीज प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
सोसायटीचे चेअरमन, भाई शिंदे सुपिकता निर्देशांकाप्रमाणे खत वापरावेत. संयुक्त खते मागणीप्रमाणे उपलब्ध करून देऊ. तसेच शेतकरी पडीक जमिनीवर फळबाग वाढवून आर्थिक स्थर उंचवावा.
सरपंच अनिल शिंदे यांनी भविष्यात शेतकऱ्यांनी बियाणे बाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्याकडील स्थानिक वाणांचे संवर्धन केले पाहिजे, असे संगितले. यावेळी भाई शिंदे, चेअरमन अनिल शिंदे, सरपंच दत्ताराम बंगाल, अजय शिंदे, गणेश शिंदे, सुनील शिंदे व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कृषी सहायक दादा खारतोडे यांनी केले हाेते़
----------------------
चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे जागृती माेहिमेअंतर्गत कृषी पर्यवेक्षक मनोज गांधी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले़