विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:59 PM2022-05-13T17:59:53+5:302022-05-13T18:00:35+5:30

बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल.

Farmers should prosper by mutual consent in the coming years by combining research from universities and knowledge of farmers dealings says Governor Bhagat Singh Koshyari | विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

विद्यापीठाचे संशोधन, शेतकऱ्यांचे ज्ञान यांची सांगड घाला : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next

दापोली : विद्यापीठामधून होणारे संशोधन आणि शेतकऱ्यांचे व्यवहार ज्ञान यांची सांगड घालून येणाऱ्या काळात परस्पर सामंजस्याने शेतकरी संपन्न झाला पाहिजे. बाजारात जे विकले जाते ते पिकेल या धोरणानुसार सर्वांनी काम करावे आणि अशा प्रदर्शनातून याला बळ मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘सुवर्ण पालवी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन राज्यपाल काेश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे तसेच भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जाती-जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत उपस्थित होते. तसेच आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड तसेच या प्रदर्शनाचे प्रायोजक पितांबरी समूहाचे रवींद्र प्रभूदेसाई यांचीही उपस्थिती हाेती.

राज्यपाल काेश्यारी म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरुन दिले आहे. एका बाजूला डोंगररांगा दुसऱ्या बाजूला सागर किनारा असणाऱ्या या जिल्ह्याची ओळख हापूस आंब्यामुळे संपूर्ण जगाला आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरित क्रांती आणि आता नीलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेती विज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकाची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यंदा मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरविण्यास शासन तयार आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी स्वागतपर भाषणात कुलगुरु डॉ. सावंत यांनी विद्यापीठाची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील नियोजन याबाबत माहिती दिली.

Web Title: Farmers should prosper by mutual consent in the coming years by combining research from universities and knowledge of farmers dealings says Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.