वाढत्या पावसाचा ओघ बघता शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:45+5:302021-09-27T04:33:45+5:30
दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा ...
दापोली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारपासून पावसाचा आलेख वाढला आहे. मात्र, गुरुवारी पहाटे जोरदार पडणारा पाऊस दुपारच्या सत्रात शांत झाला हाेता; मात्र मुंबई हवामान केंद्राकडून पावसाचा जोरदार तर अति जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीची काळजी घेण्याचे आवाहन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे कोकण विभागात पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण विभागातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी काेसळल्या हाेत्या. तर २६ सप्टेंबर रोजी कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाच्या पावसाची तर मुंबई, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांची मात्रा, कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणीची कामे पुढे ढकलावीत. नवीन फळबाग लागवड केलेल्या कलमांच्या बुंध्याजवळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
तसेच भात, भाजीपाला पिके, भुईमूग, हळद, नारळ, सुपारी, चिकू, केळी, पपई बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पक्व हळवे भात खाचरातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकण्यात आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू किंवा मोकळे सोडू नये, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.