तासगावचे शेतकरी द्राक्षाच्या विक्रीसाठी रत्नागिरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:31 AM2021-03-19T04:31:14+5:302021-03-19T04:31:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तासगाव तालुक्यातील येळावी येथील संदीप पवार आणि इकबाल पठाण हे दोन शेतकरी आपल्या बागेतील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तासगाव तालुक्यातील येळावी येथील संदीप पवार आणि इकबाल पठाण हे दोन शेतकरी आपल्या बागेतील द्राक्षांच्या विक्रीसाठी रत्नागिरीत आले आहेत. दोन किलोच्या बाॅक्समधून ही द्राक्षे विकली जात आहेत. एका खेपेला सुमारे एक हजार किलो द्राक्षे घेऊन हे शेतकरी गेले पंधरा दिवस अधूनमधून येत आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांना कमी दरात द्राक्षे मिळू लागली आहेत.
रत्नागिरीत सध्या द्राक्षे ८० ते १०० रुपये किलो दराने बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून द्राक्षे विकली जात आहेत; मात्र गेल्या १५ दिवसांपासून तासगाव तालुक्यातील येळावी येथील शेतकरी पवार आणि पठाण हे दोन शेतकरी दोन तीन दिवसांनंतर रत्नागिरी येथे आपल्या बागेतील द्राक्षे घेऊन येत आहेत. पवार यांची येळावी येथे सुमारे दोन हजार हेक्टरवर द्राक्षाची बाग आहे. कोरोना काळात उत्पादनाचा उठाव न झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांकडून कमी भावात मागणी होऊ लागली. त्यामुळे हे नुकसान सोसण्यापेक्षा कोकणात जावून द्राक्षांची विक्री केल्यास थोडाफार नफा मिळेल, या विचाराने रत्नागिरीत आल्याचे पवार यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यालगत वाहन थांबवून हे दोन शेतकरी दिवसभर द्राक्षाची विक्री करीत आहेत, अन्य ठिकाणी ८० ते १०० रुपयांनी द्राक्षे विकली जात आहेत; मात्र त्या दरात या शेतकऱ्यांकडून दीड ते दोन किलो द्राक्षे मिळत असल्याने या शेतकऱ्यांच्या द्राक्षाला चांगलाच उठाव मिळत आहे. रत्नागिरीप्रमाणेच कराड, आंबा आदी ठिकाणीही द्राक्षे पाठविली जात आहेत. दोन किलोच्या बाॅक्समधून द्राक्षांची विक्री केली जात आहे.
चौकट
रत्नागिरीतील नागरिकांना इतर ठिकाणांपेक्षा या शेतकऱ्यांकडून कमी दराने द्राक्षे मिळत असल्याने द्राक्षाच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे; मात्र यामुळे शहरातील बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांच्या विक्रीवर परिणाम होऊ लागताच त्यापैकी काहींनी या शेतकऱ्यांना रत्नागिरीत द्राक्षे विकायला यायचे नाही, अशी दमदाटी केल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या जागतिक स्तरावर सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या असतानाच रत्नागिरीकरांना भरमसाठ दराने भाजी, फळे विकणाऱ्या बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांकडून अशी दमदाटी केल्याबद्दल काही नागरिकांनीच गुरुवारी संताप व्यक्त केला.