पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:21 AM2021-07-09T04:21:13+5:302021-07-09T04:21:13+5:30
लांजा : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे लांबणीवर पडली ...
लांजा : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे लांबणीवर पडली आहेत. भात शेतामध्ये पाणी नसल्याने लावणी लावलेल्या भात जमिनीला तडे गेले आहेत. तर प्रखर उन्हामुळे भातशेती करपून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गुरुवारी तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली हाेती. मात्र, पावसाचे प्रमाण कमीच हाेते.
जून महिन्यातील पौणिमेला दोन दिवस पडलेल्या पावसानंतर गेले पंधरा दिवस पावसाने दडी मारली आहे. शेतकरी भातशेती विहिरीवर पंप लावून, शेतीची कामे लवकरात लवकर आटोपण्यासाठी धडपडत होता. मात्र, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली भातशेती पाऊस गायब झाल्याने लावायची तरी कशी, या विवंचनेत शेतकरी आहेत. पाऊस नसल्याने लावणीची कामे लांबणीवर पडल्याने त्यातच लावण्यात आलेल्या भात शेतामध्ये पाणी नसल्याने शेतामध्ये तडे गेले आहेत. बुधवारी ढगांचा गडगडाट होत होता. मात्र, पूर्व भागातच पाऊस पडत होता. गुरुवारी दुपारी आकाशामध्ये काळे ढग जमा झाले आणि आता सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता असताना दुपारी १.१५ वाजता अर्धा तास जोरदार पाऊस शहरामध्ये पडला. मात्र, पश्चिम भागामध्ये रिमझिम पाऊस पडल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.
----------------------------
पावसाने दडी मारल्याने लांजा तालुक्यातील अनेक भागात भातशेतीला तडे गेले आहेत. अजून काही दिवस पावसाने हजेरी न लावल्यास लावलेली भात राेपे वाया जाण्याची भीती व्यक्त हाेत आहे.