कळंबस्ते आरोग्य उपकेंद्र येथील उपोषण तूर्तास स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:43+5:302021-07-21T04:21:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावातील लसीकरण केंद्र अदला-बदलीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य तंटामुक्ती ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावातील लसीकरण केंद्र अदला-बदलीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारिणी सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष मज्जिद शरीफ नेवरेकर यांनी कळंबस्ते उपकेंद्राजवळ उपाेषण सुरू केले हाेते. तहसीलदार व तालुका आराेग्य अधिकारी यांनी उपाेषणकर्ते मज्जिद नेवरेकर यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर हे उपाेषण स्थगित केले.
या उपोषणाची आमदार शेखर निकम यांनी दखल घेत तालुका प्रशासनाला उपोषणस्थळी जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी कळंबस्ते उपकेंद्राला भेट देऊन उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांनीही उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यापुढे लसीकरणाबाबत योग्य ती काळजी घेऊन व लोकांना विश्वासात घेऊन लसीकरण केले जाईल व जो प्रकार झाला आहे त्याची योग्य ती चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
आमदार, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या विनंतीचा मान राखून हे उपोषण स्थगित करण्यात आले. परंतु, योग्य ती कार्यवाही न झाल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणास सर्व ग्रामस्थ बसू, असे सांगण्यात आले.