मुलाच्या औषधोपचाराच्या पैशांसाठी उपोषण
By Admin | Published: August 13, 2016 10:21 PM2016-08-13T22:21:47+5:302016-08-14T00:30:20+5:30
महेंद्र मिश्रा : हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याकडून मारहाण; पालकांनी पैसे देण्याची दिली होती कबुली
दापोली : दापोली शहरातील काळकाई कोंड येथील रहिवासी महेंद्र मिश्रा हे घरोघरी फिरुन अगरबत्तीचा व्यवसाय करतात. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. त्यांचा मुलगा आकाश याला ए. जी. हायस्कूलमध्ये अन्य एका विद्यार्थ्यामुळे मार्च २०१६ मध्ये गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्याच्या औषधोपचारांचा खर्च संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी देण्याचे कबूल केले होते. मात्र, कबूल केल्याप्रमाणे औषधोपचारांसाठी मदत न देण्यात आल्याच्या निषेधार्थ मिश्रा कुटुंबाने १५ आॅगस्ट रोजी ए. जी. हायस्कूलसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
सागर सावंतदेसाई या मुलाने आपल्याच वर्गातील आकाश मिश्रा याची मान आवळून त्याला मारहाण केली होती. हा प्रकार मार्च महिन्यात घडला होता. त्यामुळे आकाशला तातडीने मिरज येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथे उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर १७ मार्च २०१६ रोजी दापोली पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शेलार, ए. जी. हायस्कूलचे अधिकारी यांची बैठक झाली होती. या बैठकीत आपल्या मुलाच्या औषधोपचारांसाठी झालेला २ लाख ५० हजार रुपये व त्यानंतर होणारा सर्व खर्च शाळा व सावंतदेसाई यांनी करू, असे कबूल केले होते.
मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम मिश्रा कुटुंबियांना दिलेली नाही. त्यामुळे मिश्रा यांना आपल्या पत्नीच्या स्त्रीधनासह अन्य दागिने गहाण ठेवून मुलाच्या औषधोपचारांचा खर्च भागवावा लागला होता. मात्र, तरीही त्याची प्रकृती स्थिर होत नसल्याने मिश्रा कुटुंबिय हताश झाले आहेत. आता त्यांची घरात उपासमार होत असून, आता या कुटुंबाला दोनवेळच्या जेवणाचीदेखील भ्रांत पडल्याची विदारक स्थिती आहे.
मिश्रा यांनी उपोषणाचे पत्र ए. जी. हायस्कूल त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ८ आॅगस्ट रोजी मिश्रा यांच्या घरी जात त्यांना दरडावले होते. याचा धसका आकाशने घेतला आणि त्या संध्याकाळपासून त्याला फिट येणे सुरू झाले. त्याला मंगळवारी पहाटे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथून शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शाळा, सावंतदेसाई आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आपण उपोषण करत असल्याचे मिश्रा यांनी निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आपल्या उपोषणाची आणि जीविताची सर्वस्वी जबाबदारी सावंतदेसाई कुटुंबिय व पोलीस प्रशासनावर राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)