संगणक परिचालकांचे २९ पासून उपोषण
By admin | Published: December 24, 2014 10:12 PM2014-12-24T22:12:15+5:302014-12-25T00:15:23+5:30
विविध मागण्या : अल्प मानधनाविरोधात आता संघर्षाचा लढा...
रत्नागिरी : ग्रामपंचायतीसाठी डाटाएंट्री आॅपरेटर्स म्हणून गेली तीन ते साडेतीन वर्षे कार्यरत असताना त्यांना दिले जाणारे मानधन तुटपूंजे आहे. विविध मागण्यांसाठी डाटा आॅपरेटर्स दीड महिन्यापासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यव्यापी आंदोलन सुरू असतानाही शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय करार संपुष्टात आणण्याचे एसएमएस पाठविण्यात येत असल्याने डाटा एन्ट्री आॅपरेटर्स दि.२९ पासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत.
हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालक मानधनाचा विषय मांडण्यात आला होता. इतकेच नव्हेतर राज्य संघटनेची बैठकही झाली होती. आंदोलनास दीड महिना पूर्ण झाला असल्याने काही परिचालकांना महाआॅनलाईन कंपनीने सेवा करार संपविल्याचे लेखी पत्र, एसएमएस पाठविले आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांच्याशी परिचालकांनी संपर्क साधला असता असे कोणतेही निलंबन होणार नसल्याचे सांगितले. सध्या कार्यरत असलेल्या परिचालकांना काढून टाकून त्यांच्या जागी नवीन परिचालकांची नियुक्ती केली जाणार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज्यातील सर्व परिचालकांचे मानधन वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
परंतु संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. महाआॅनलाईनबरोबरचा करार संपुष्टात करावा व परिचालकांना शासनसेवेत समाविष्ट करावे, तसेच मान्य केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात शासनाने द्याव्यात, असे राज्यसंघटनेचे म्हणणे आहे. दि.२९ रोजी आझाद मैदानावर सर्व संगणक परिचालक उपोषणास बसणार आहेत. (प्रतिनिधी)
राज्यव्यापी आंदोलन सुरु असताना शासनाकडून निर्णय होत नसल्याने संगणक परिचालक संतप्त.
आझाद मैदानावर सोमवारपासून करणार उपोषण.
आंदोलनाला दीड महिना पूर्ण.
परिचालकांचे निलंबन न करण्याचे ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन.