आरजीपीपीएल विरोधात उपोषणाचा इशारा
By admin | Published: March 16, 2015 11:14 PM2015-03-16T23:14:03+5:302015-03-17T00:07:55+5:30
कामगारांनी अशाप्रकारच्या डावपेचांना बळी न पडता ऐक्य कायम ठेवत न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला.
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील सी अॅण्ड एम फायनान्स विभागात काम करणाऱ्या १६ कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत दि. २३ मार्चपासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कॉन्ट्रॅक्ट अॅण्ड मटेरियल फायनान्स विभागाच्या कामगारांना याबाबतचे लेखी निवेदन कंपनी प्रशासन तसेच पोलीस निरीक्षक गुहागर यांना दिले आहे. हे कामगार गेली सहा वर्षे कंपनीत कार्यरत आहेत. दरम्यान ठेकेदार बदलत राहिले तरीही हे कामगार कंपनीत सतत काम करत आहेत. दि. १ मार्च २०१५ पासून या कामाचा ठेका मेसर्स के . डॅनियल यांना मिळाला. ठेकेदार नेमण्याचे काम युटीलीटी पॉवर लि. (युपीएल) या मुख्य ठेकेदार कंपनीमार्फत होते. मात्र कंपनी प्रशासनाने हस्तक्षेप करत मेसर्स के. डॅनियल या ठेकेदारला ठेका मिळालेला असताना त्यांना वर्क आॅर्डर दिली नाही. परस्पर दोन महिन्यांसाठी नवीन निविदा काढून नव्या ठेकेदारामार्फत नवीन माणसे घेण्याचा घाट घातला. त्यानंतर काही कामगारांना वगळण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, कामगारांनी अशाप्रकारच्या डावपेचांना बळी न पडता ऐक्य कायम ठेवत न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला. याप्रकरणी प्रशासनाचा निषेध करत न्याय हक्कांसाठी व सर्वांना कामावर घ्यावे या मागणीसाठी दि. २३पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)