हातिवलेत दोन एसटींचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2016 12:21 AM2016-08-13T00:21:38+5:302016-08-13T00:35:58+5:30

एक ठार, ७१ जखमी : ९ गंभीर, दोन्ही चालकांसह तिघांची प्रकृती अत्यवस्थ

Fatal accidents of the hit two STs | हातिवलेत दोन एसटींचा भीषण अपघात

हातिवलेत दोन एसटींचा भीषण अपघात

Next

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे दोन एस. टी. बसेसची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये धोपेश्वर खांबलवाडी (राजापूर) येथील यशोदा यशवंत खांबल ही ६५ वर्षीय महिला जागीच ठार झाली. या अपघातात ७१ प्रवासी जखमी झाले असून, ९ जणांना पुढील उपचारार्थ रत्नागिरीला हलवण्यात आले आहे. दोन्ही बसचालकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तसेच अन्य एका प्रवाशाला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतून कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. जखमी प्रवाशांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
शुक्रवारी सकाळी राजापूर आगारातून हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाकडे जाणारी कॉलेज बस (एमएच- १४/ बीटी 0१८८) विद्यार्थ्यांसह प्रवासी घेऊन जात होती. एम. डी. मोरे बसचालक होते. महामार्गावरील हातिवले येथे हॉटेल अंकिता पॅलेसजवळील एका वळणावर एक टेम्पो महामार्गाच्या कडेला उभा होता. महाविद्यालयाकडे जाणारी बस टेम्पोला ओव्हरटेक करून पुढे जात असतानाच समोरून जुवाठी-राजापूर (एमएच- १४/ बीटी २०४३) ही बस आली. ही बस प्रमोद भगवान वाकोडे चालवत होते. या दोन्ही गाड्या एकमेकांवर जबरदस्त आपटल्या. इतका मोठा आवाज झाला की हातिवले येथील ग्रामस्थ गाड्यांच्या दिशेने धावत आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने दोन्ही गाड्यांमध्ये मोठी आरडाओरड झाली. अनेक प्रवाशांची तोंडे समोरच्या सीटवर आपटली. काहींच्या तोंडाला तर काहींच्या नाकाला मार लागून रक्त वाहू लागले.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर आगारासह राजापूर पोलिस स्थानकाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तोवर मदतकार्य सुरू झाले होते. या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही धडक एवढी भयानक होती की, दोन्ही बसेसच्या चालकांना ओढून बाहेर काढावे लागले. तोवर राजापुरातून रुग्णवाहिका दाखल झाल्या. महाविद्यालयासाठीच्या बसमधून हातिवले येथील आपल्या मुलीकडे चाललेल्या धोपेश्वर खांबलवाडीतील श्रीमती यशोदा खांबल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व जखमींना तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये एस. टी. चालक मानसिंग मोरे, प्रमोद वाकोडे यांच्यासह संदीप वेलणकर, भिकाजी आपटे, श्रध्दा नंदकिशोर मयेकर, नयन आरेकर, योगिता प्रकाश तरळ, गणेश मांडवकर व सदाफ मुनीर बंदरकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. यातील मोरे आणि वाकोडे या दोन्ही चालकांसह संदीप वेलणकर यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.
या अपघातानंतर एसटीचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. (प्रतिनिधी)
चौकट
वैद्यकीय अधीक्षक गैरहजर
या अपघातानंतर राजापूर ग्रामीण रुग्णालयात असणारे डॉ. मेस्त्री वगळता अन्य कोणतेही डॉक्टर उपस्थित नव्हते. राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश चव्हाण हे सकाळपासून रुग्णालयात हजर नव्हते. अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे उपस्थितांमध्ये संतप्त चर्चा सुरू होती.

चार रुग्णवाहिका
अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ रत्नागिरीला हलवण्यासाठी रायपाटण, हातखंबा, पावस येथील १०८ क्रमांकाशी संलग्न अ‍ॅम्बुलन्सना तत्काळ बोलावण्यात आले. नेहमीप्रमाणे नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली होती.

देव तारी त्याला...
जुवाठी बसमधून प्रवास करणाऱ्या तृप्ती हरिष जोशी यांचा एक वर्षाचा मुलगा नयन हा सीट खाली पडला होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

खासगी डॉक्टर्स मदतीला धावले
जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयाकडे हलवण्यात आले. पण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे कळताच राजापूर शहरात खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या अनेक डॉक्टर्सनी रुग्णालयाकडे धाव घेतली आणि जखमींवर उपचार सुरू केले. यामध्ये डॉ. सागर पाटील, डॉ. पी. एस. बावकर, डॉ. मांडवकर, डॉ. पावसकर, डॉ. बाईत, डॉ. बी. डी. पाध्ये, डॉ. सुयोग परांजपे, आदींचा समावेश होता. जवळच्याच ओणी, धारतळे, सोलगाव, इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही येथे पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Fatal accidents of the hit two STs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.