जीवघेण्या चिरेखाणी जीवनदायी ठरतील
By Admin | Published: July 29, 2016 09:49 PM2016-07-29T21:49:19+5:302016-07-29T23:26:35+5:30
जिल्हाधिकारी यांची सतर्कता : महिलेचा बळी गेल्याने चिरेखाणींबाबत अहवाल देण्याचे आदेश
रत्नागिरी : वेळवंड (ता. रत्नागिरी) येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास पाण्याने भरलेल्या चिरेखाणीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याने रिकाम्या चिरेखाणी बंदिस्त करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व मंडल अधिकाऱ्यांना चिरेखाणीसंदर्भातील अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पाणी साठवणुकीचा पर्याय म्हणून या खाणींकडे पाहिले गेले तर या जीवघेण्या खाणी जीवनदायी खाणी ठरतील, एवढी या खाणींची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, प्रशासन वा लोकप्रतिनिधींकडून आजपर्यंत त्यादृष्टीने कधीही लक्ष देण्यात आलेले नाही.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रिकाम्या चिरेखाणी सध्या पाण्याने तुडुंब भरलेल्या दिसत आहेत. सोमवारी सायंकाळी वेळवंड येथील कमल यशवंत गावडे या महिलेचा शेतीनजीक असणाऱ्या चिरेखाणीवर हातपाय धुण्यासाठी गेली असता बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे चिऱ्यांचे उत्खनन झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या चिरेखाणी बुजवून टाकाव्यात अथवा त्याभोवती कुंपण घालावे, हा नियम चिरेखाण मालकांकडून धुडकावला जात आहे, हे सत्य समोर आले आहे.
मात्र, चिरेखाण मालकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक भागात अशा रिकाम्या चिरेखाणी उघड्याच असल्याचे दिसून येते. वर्षानुवर्षे या चिरेखाणी उघड्या राहिल्याने पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये भरलेल्या या चिरेखाणींमध्ये जनावरे पडून मृत झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. मात्र, त्याची दखल संबंधित चिरेखाण मालकांकडून घेतली जात नसल्याचे दिसून येत असून, प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कडक कारवाई केल्याचे अजूनतरी निदर्शनास आलेले नाही. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत.
सोमवारी वेळवंड येथील महिलेचा अशा पाण्याने भरलेल्या चिरेखाणीमुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात अशा परवानाधारक पण रिकाम्या झालेल्या चिरेखाणी बंदिस्त करण्याचा प्रयत्न किती चिरेखाण मालकांकडून झाला आहे. किती उघड्या आहेत, याचा अहवाल गोळा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व मंडल अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून सर्व चिरेखाणींचा अहवाल लवकरात लवकर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चिरेखाणी रिकाम्या झाल्यानंतर बुजवून टाकण्यात आल्या आहेत आणि किती चिरेखाणींभोवती कुंपण घालण्यात आले आहे, याची माहिती या अहवालाद्वारे मिळणार आहे. (प्रतिनिधी)
चिरेखाणी बुजविणे : कुंपण बंधनकारक
खरेतर चिरेखाणीतील उत्खनन पूर्ण झाल्यावर त्या चिरेखाणी बुजवून टाकणे किंवा त्यांच्याभोवती कुंपण घालणे, चिरेखाणमालकांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. ही अट मान्य असलेल्या चिरेखाणी मालकांनाच परवाने दिले जातात. त्याची अमलबजाणवणी होत नाही.
रिकाम्या चिरेखाणींचा पाणी साठवण्यासाठी चांगल्या रितीने उपयोग होऊ शकेल. पावसाळ्यातील चार महिने या चिरेखाणीत पाणी साठून राहाते. हे पाणी झिरपत आसपासच्या अनेक विहिरींना जाऊन मिळते. यासाठी चिरेखाणींच्या पाण्यात ‘रेडियो आयसोटोप्स’चे विविध रंग टाकले, तर कुठल्या चिरेखाणीतील पाणी कुठल्या विहिरीत जाते, हे लक्षात येईल. त्यामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. खाणींभोवती बंदिस्त कुंपण घालून त्यांचा उपयोग पावसाळ्यातील जलसंचयासाठी केला तर चिरेखाणी घातक न ठरता उपयुक्त ठरतील. यासाठी संबंधित यंत्रणेने सकारात्मक भूमिका घ्यायला हवी.
- प्रा. श्रीधर शेंड्ये (सेवानिवृत्त),
सदस्य, भारतीय पर्यावरणशास्त्र व तंत्रज्ञान शाखा, रत्नागिरी.