व्यसनावरून वडील ओरडले, मुलाने स्वत:चे जीवन संपवले; राजापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:49 PM2023-08-23T16:49:22+5:302023-08-23T16:50:03+5:30
राजापूर : दारुच्या व्यसनावरुन वडील ओरडल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणाने गवत फवारणीचे औषध प्राशन करुन जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार ...
राजापूर : दारुच्या व्यसनावरुन वडील ओरडल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणाने गवत फवारणीचे औषध प्राशन करुन जीवन संपविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. राजापूर तालुक्यात भू येथील कुंभारवाडी येथे ही घटना घडली. ऋषिकेश सुरेश कुंभार असे या मृत युवकाचे नाव आहे.
ऋषिकेश हा मासेमारी नौकेवर कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनावरून 6 ऑगस्ट रोजी त्याचे वडिलांशी भांडण झाले होते. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने टोकाचे पाऊल उचलत रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले.
अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी व नातेवाईकांनी मदत करून तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ऋषिकेशचा मृत्यू झाला. याप्रकरणाची नोंद मुंबई येथून राजापुर पोलिस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली असुन या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.