बारशाला जाताना पित्याचा मृत्यू
By admin | Published: May 14, 2016 12:27 AM2016-05-14T00:27:44+5:302016-05-14T00:27:44+5:30
दोन्ही चालक गंभीर : धामणी येथे कारची रिक्षाला धडक
बारशाला जाताना पित्याचा मृत्यू
दोन्ही चालक गंभीर : धामणी येथे कारची रिक्षाला धडक
आरवली : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे कार आणि रिक्षा यांच्या अपघातात विनोद मारुती गमरे (वय ३५,मूळ गाव, धामापूर-बौद्धवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. विनोद आपल्या मुलीच्या बारशासाठी मुंबईहून गावी आला होता. रेल्वे स्थानकाकडून घराकडे जाताना हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही गंभीर चालकांना डेरवणमधील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये राहणारे विनोद गमरे हे आपल्या मुलीच्या बारशासाठी शुक्रवारी पहाटे रेल्वेने संगमेश्वर रोड, रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून ते रिक्षाने आपल्या गावी धामापूर-बौद्धवाडी येथे जाण्यासाठी निघाले. ती रिक्षा त्यांच्या गावापर्यंत जाणार नव्हती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने वाटेत दुसऱ्या एका रिक्षाचे (एमएच 0८ के १४३९) चालक लीलाधर पंडित (चिखली, ता. संगमेश्वर) यांना थांबविले.
पंडित धामणीकडेच जात असल्याने गमरे त्यांच्या रिक्षामध्ये बसले आणि पुढे एक होंडा कार (एचआर २0 क्यू 00९0) त्यांच्या रिक्षाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात रिक्षा पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे रिक्षातील गमरे जागीच ठार झाले. रिक्षाचालक पंडित आणि कारचालक चमनलाल राजकुमार मित्तल (दिल्ली) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लगेचच डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारमध्ये अन्य दोघेजण होते. ते मुंबईहून गोव्याकडे जात होते. मात्र, त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)
काळ आणि वेळ
आलीच होती...
गमरे यांच्या मुलीचे १९ मे रोजी बारसे होते. त्यासाठी ते आणि त्यांचे काही नातेवाईक मुंबईहून निघाले. इतर नातेवाईक दुसऱ्या रेल्वेने आले. गमरे त्यांच्या आधी निघाले असल्याने ते लवकरच्या रेल्वेमध्ये बसले. रेल्वेतून उतरल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी ते रिक्षामध्ये बसले. मात्र, ती रिक्षा त्यांच्या गावाकडे जाणारी नव्हती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने वाटेत धामणीकडे जाणाऱ्या रिक्षावाल्याला थांबविले आणि गमरे त्या रिक्षात जाऊन बसले. पुढे केवळ २00 मीटर अंतर गेल्यावरच हा अपघात झाला. गमरे यांचा काळ आणि वेळ एकत्र आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटत होती.