वडिलांचे छत्र हरपलेल्या रुपालीची भरारी
By admin | Published: June 14, 2016 09:22 PM2016-06-14T21:22:04+5:302016-06-15T00:05:17+5:30
यशाचे कौतुक : मोलमजुरी करणाऱ्या आईचा चांगले शिक्षण देण्याचा निर्धार
चिपळूण : लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. आईने मोलमजुरी करुन मुलीला शिक्षण देण्याचा निर्धार केला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रुपाली मंगेश हुंबरे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत ९१.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिचा आदर्श अन्य विद्यार्थ्यांनी घ्यावा.
खेड तालुक्यातील धामणदिवी देऊळवाडी येथील मंदा यांचा विवाह कोतवली पाटीलवाडी येथील मंगेश यांच्याशी झाला. नोकरी नसल्यामुळे आपण स्वत: काही तरी केले पाहिजे म्हणून पुणे येथे जाऊन त्यांनी हातगाडीवर इडली विक्रीचा व्यवसाय सुरु केला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस सुखात जात असतानाच एक गोंडस मुलगी या घरात जन्माला आली. मुलगा किंवा मुलगी काय, याचा विचार न करता या कुटुंबाने तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. काबाडकष्ट करून सुखी संसार सुरु होता. त्यातच दुसरीही मुलगी झाली. दरम्यान, हसत्याखेळत्या संसाराला ग्रहण लागले. मंगेश हे आजारी पडले. औषधोपचार करुनही नियतीने अखेर आपला डाव साधला. काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. मंदा यांच्यावर आभाळचं कोसळलं. पती असेल तर साजं, तो नसेल तर अथांग सागरात उन्मळून पडलेले जहाज... अशी स्थिती मंदा यांची झाली. परंतु, या काळात नातेवाईकांनी धीर दिला. आपल्या दोन मुलींच्या भविष्याचं काय होणार, असा प्रश्न मंदा यांना भेडसावत होता. भाऊ एकनाथ बकवे यांनी आधार दिला.
मंदा या आपल्या माहेरी धामणदिवी देऊळवाडी येथे आल्या. भाऊ व त्याच्या कुटुंबावर आपला भार नको, म्हणून मंदा यांनी घरकाम सुरु केले. मुलींना कोणत्याही परिस्थितीत शिक्षण द्यायचं, असा त्यांनी निर्धार केला. मोठी मुलगी रुपाली हिला गावातीलच शाळेत दाखल केले. लहानपणापासूनच रुपाली हुशार होती. आईच्या कष्टाचे चीज करायचे ही इच्छा तिने मनी धरली. चांगला अभ्यास करुन पास व्हायचे, असे तिने ठरवले.
मुलीच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू द्यायचे नाही, या भावनेतून मिळेल ते काम मंदा या करीत होत्या. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर रुपाली हिने पेढे परशुराम येथील आर. सी. काळे माध्यमिक विद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुपालीला मदत करण्यासाठी भारतीय समाज सेवा केंद्र, चिपळूणतर्फे विशेष आर्थिक सहाय्य देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. तिला शाळेसाठी लागणारे साहित्य व पुस्तके या संस्थेने दिली. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवायचे, असा निर्धार करुन रुपाली अभ्यास करीत होती. तिने केलेल्या अभ्यासाचे चीज झाले. दहावीच्या परीक्षेत रुपाली ९१.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय आली. तिची दुसरी बहीण मनाली हिने नववीत प्रवेश घेतला आहे. सध्या मामा एकनाथ बकवे याने घराच्या बाजूलाच मंदा यांना एक खोली दिली आहे. आपल्या दोन्ही मुलींचे भविष्य उज्वल व्हावे, अशी अपेक्षा मंदा यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले असले तरी आईने काबाडकष्ट करून आम्हाला शिक्षण देण्याचा जो वसा घेतला आहे, तिची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अभ्यास करुन पुढील जीवनातही मी चांगले गुण मिळवणार आहे. आईने केलेल्या कष्टाला मामाचीही साथ मिळाली, त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले.
- रूपाली हुंबरे