पाली विभागात पुन्हा १३ कोरोना रुग्ण आढळल्याने भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:23+5:302021-04-13T04:30:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरात पुन्हा १३ कोरोना रुग्णांची भर पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाली : रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरात पुन्हा १३ कोरोना रुग्णांची भर पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णसंख्या वाढताच स्थानिक ग्रामपंचायतींनी सध्या रुग्ण सापडत असलेल्या भागात निर्जंतुकीकरणाची मोहीम उघडली आहे.
शिमगोत्सवानंतर गेल्याच आठवड्यात पाली विभागातील पाली, कापडगाव आणि खानू या गावांत १२ रुग्ण सापडले होते. त्यातील सात रुग्ण पालीमधील होते. उर्वरित पाच रुग्णांत चार कापडगावचे व एक खानू येथील होता. विशेष म्हणजे या बारा रुग्णांतील एक वयोवृद्ध रुग्ण कोरोनाचा बळी ठरला आणि तो कापडगावचा होता.
ग्रामस्तरावर सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्राम कृती दल काळजी घेत असतानाच पुन्हा पालीमध्ये १० रुग्ण सापडले, तर बाजूच्या बांबर या गावी तीन रुग्ण सापडले. त्यामुळे सद्यस्थितीत सापडलेले रुग्ण पाहता, पालीतील दोन भाग संवेदनशील बनण्याच्या मार्गावर आहेत. पाली येथील सुतारवाडीमधील एका चाळीत एक दाम्पत्य प्रथम कोरोना पॉझिटिव्ह झाले,तर एक युवक पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या शेजारील चारजण पॉझिटिव्ह बनले. ही दोन्हीही घरे भरवस्तीत असल्याने ग्रामस्थ धास्तावलेले होते. मात्र त्यांची चाचणी आरोग्य विभागाने केल्यावर ती निगेटिव्ह आली. त्यामुळे या शेजाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.
पालीत वाढत असलेले कोरोना रुग्ण पाहता, नुकतीच पंचायत समिती सभापती रंजना माने, पाली उपसभापती उत्तम सावंत यांनी ग्रामपंचायत पालीला भेट देऊन ग्राम कृती दलाच्या कामाचा आढावा घेतला.