वाशिष्ठी पुलाविषयी वाहतूकदारांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:27+5:302021-07-07T04:38:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील बहादूरशेख चौक येथील वाशिष्ठी पूल धोकादायक असल्याचे सोशल मीडियावर वारंवार ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील बहादूरशेख चौक येथील वाशिष्ठी पूल धोकादायक असल्याचे सोशल मीडियावर वारंवार व्हायरल केले जात आहे. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काेणतीही माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
काही वर्षांपूर्वी महाडमधील सावित्री नदीचा पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. तेव्हापासून महामार्गावरील ब्रिटीशकालीन पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वाशिष्ठी नदीवरील पूलही धोकादायक झाला आहे. त्यासाठी दरवर्षी अतिवृष्टी दरम्यान या पुलावरील वाहतूक बंद ठेवली जाते. तूर्तास येथे चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात येत असलेल्या पुलाचे कामही वेगाने सुरु आहे. मात्र, आता पाऊस कमी असतानाही सोशल मीडियावर हा पूल धोकादायक असल्याचे व्हायरल केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी कामथे घाटात दरड कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात हा व्हिडीओ कामथेतील नव्हता. त्याचपद्धतीने आता वाशिष्ठी पुलाविषयी गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक भीती घातली जात आहे. त्यामध्ये लोटे- परशुरामकडे जाण्यासाठी लागणारा वाशिष्ठी नदीचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे, असे प्रशासनाने जाहीर केल्याचे समजले आहे. एस. टी. महामंडळ, खासगी शाळांच्या बस आणि लोटे औद्योगिक वसाहतीतील बस गुहागर बायपासमार्गे लाईफ केअर हाॅस्पिटलसमोरून एन्राॅन पुलावरून वाहतूक होणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून असे कोणतेही आवाहन करण्यात आले नसल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. आर. मराठे यांनी सांगितले.