तेलेवाडी पाझर तलावाला भगदाड, फणसवणे पंचकोशीमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:09+5:302021-07-28T04:33:09+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी पाझर तलावाला (धरणाला) भगदाड पडल्याने फणसवणे पंचकोशीमध्ये भीतीचे वातावरण पसरले ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी पाझर तलावाला (धरणाला) भगदाड पडल्याने फणसवणे पंचकोशीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या तलावाच्या कामासाठी मे महिन्यात लाखाे रुपये खर्च करण्यात आले हाेते. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच तलावाला भगदाड पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
१९८० साली या पाझर तलावाचे बांधकाम करण्यात येऊन यावर जवळपास दहा गावाची प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात आली होती. प्रादेशिक नळपाणी योजनेबरोबर उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचे नियोजन करण्यात आले होते, मात्र ते कागदावरच राहिले आहे. या तलावाची अवस्था ही चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणासारखी झाली आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करूनही भगदाड पडल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण हाेत आहे.
या धरणावर मे महिन्यात देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. ज्याठिकाणी पाण्याचा विसर्ग होतो. त्या फरशीला आतून पिचिंग करण्यात आले. तलावात पाणीसाठा जास्त झाल्यास तो सोडण्यासाठी असणाऱ्या दरवाजांना कित्येक वर्ष हात न लावल्याने पूर्णतः नादुरुस्त झाले आहेत.
जिल्ह्यात काेसळलेल्या मुसळधार पावसानंतर पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील तलावाची पाहणी करणे गरजेचे हाेते. मात्र, अद्याप या तलावाकडे काेणीही अधिकारी फिरकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी या तलावाजवळ काही ग्रामस्थ गेले असता तलावाच्या फरशीला भगदाड पडल्याचे दिसले. ही बाब ग्रामस्थानी कळंबस्ते ग्रामपंचायतीचे सदस्य राजू पाटील यांना सांगितली. त्यांनी सरपंच, तलाठी आणि ग्रामस्थांसमवेत धरणाकडे जाऊन पाहणी केली. त्यावेळी धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतो तेथे बाहेरील बाजूस मोठे भगदाड पडल्याचे दिसले. याबाबत संगमेश्वरचे तहसीलदार यांना तत्काळ माहिती देऊन धरणाखालील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात यावा, अशी सूचना तलाठी यांना देण्यात आले. हा तलाव फुटला तर कळंबस्ते, फणसवणे, कसबा आदी गावांना धोका पोहचू शकतो, त्यामुळे याबाबत तत्काळ उपाययाेजना करण्याची मागणी हाेती आहे.
--------------------------------
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते-तेलेवाडी येथील पाझर तलावाला भगदाड पडले असून, हा तलाव धाेकादायक बनला आहे.