पर्यटन महोत्सवासाठी भिंतीनाही झळाळी
By admin | Published: April 29, 2016 12:03 AM2016-04-29T00:03:40+5:302016-04-29T00:20:27+5:30
चिपळूण शहर : खाद्य, लोककला, उत्सवांचा समन्वय एकाच व्यासपीठावर
चिपळूण : कोकणात पर्यटन वाढावे, पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकास व्हावा, या कल्पनेतून शासनातर्फे गेल्या वर्षीपासून पर्यटन महोत्सव सुरू झाला. या पर्यटन महोत्सवात इथल्या लोककला, सण उत्सव, परंपरा, संस्कृती व खाद्यसंस्कृती यांचा समन्वय साधण्यात आला आहे. पर्यटनस्थळांना प्रसिध्दी मिळावी, यासाठी आता शहरातील भिंती आपला लूक बदलत आहेत, तर स्टॉलसाठी बचत गटांना मोफत संधी मिळणार असल्याने नोंदणी सुरु झाली आहे.
रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ची तयारी सुरु झाली आहे. या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, या उद्देशाने पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार सदानंद चव्हाण, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे व ग्लोबल टुरिझमचे कार्यकर्ते जनजागृती व प्रचार करीत आहेत. आमदार सदानंद चव्हाण महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी आहेत. महोत्सवात विविध स्पर्धा, आरोग्य शिबिरे, व्याख्याने यांच्यासह स्थानिक लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यासाठी महसूल विभागाचे प्रकाश सावंत, आरती गोडसे व कांता कानिटकर यांच्याकडे शनिवार, ३० पर्यंत नावनोंदणी करायची आहे. अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी हेमंत वळंजु, राजा पाथरे यांच्याकडे, तर स्टॉल बुकिंगसाठी संस्था व बचत गटांनी कृषी विभागाचे मनोज गांधी व रमण डांगे यांच्याकडे नावनोंदणी करावी. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा यासाठी सुप्रिया शिंत्रे व रिहाना बिजले यांच्याकडे, तर शोभायात्रेसाठी तहसीलदार वृषाली पाटील व बापू काणे यांच्याकडे नावनोंदणी सुरु आहे. तहसीलदार पाटील या शहरातील विविध संस्था, महिला मंडळ यांच्याशी याबाबत चर्चा करीत आहेत.
या महोत्सवासाठी चिपळूण शहरातील भिंतीवर कोकणच्या प्रतिकृतीची रंगरंगोटी केली जात आहे. यात स्वच्छ समुद्रकिनारे, मच्छीमार, कोकणचा निसर्ग व किनारपट्टी भागातील जनजीवन यांची चित्र आहेत. शिवाय शिवाजी चौक ते बहादूरशेख नाका दरम्यानच्या भिंतीवरही रंगरंगोटी होणार आहे. यासाठी सुनील कदम व त्यांचे सहकारी काम करीत आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही वातावरण निर्मिती आहे.
शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांचीही रंगरंगोटी होत आहे. पर्यटकांना येथे आकर्षित करण्यासाठी बॅनर, प्रसिध्दीपत्रके व इलेक्ट्रॉनिक मीडियाचाही वापर केला जात आहे. जागोजागी सुशोभिकरण केले जाणार असून, काही मोजक्या जागांवर कोकणची प्रतिकृती म्हणून सजावट केली जाणार आहे. जुनाट वृक्षांच्या पारालाही रंगरंगोटी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
पर्यटकांना मिळणार
लकी ड्रॉद्वारे बक्षिसे
चिपळूण येथील पवन तलाव मैदानात होणाऱ्या पर्यटन महोत्सवात येणाऱ्या पर्यटकांना पुरेपूर आनंद लुटता यावा, यासाठी लकी ड्रॉ काढून त्यातून बक्षिसे देण्यात येणार आहेत. पर्यटन महोत्सवात अॅडव्हेंचर गेम्सचा थरार, विविध सफारींचा आनंद लुटता येणार आहे.