उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:07+5:302021-09-09T04:38:07+5:30
रत्नागिरी : गणेशोत्सवाचे औचित्य साधून यंदा राज्य निवडणूक आयोगाकडून ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट ...
रत्नागिरी : गणेशोत्सवाचे औचित्य साधून यंदा राज्य निवडणूक आयोगाकडून ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मतदानाच्या अधिकाराविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.
दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणेशाचे आगमन भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपली जात आहे. याचे औचित्य साधून यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मतदानाच्या अधिकाराविषयी जागृती निर्माण करणे, हा यामागचा उपदेश आहे.
सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही श्रीगणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेशदेखील दिला जातो. या स्पर्धचा विषय ’उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या सजावटीतून जागृती करता येऊ शकते.
या स्पर्धेसाठी प्रवेशिका स्वीकृती १० ते १९ सप्टेंबर या कालावधीत https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA, या गुगल लिंकवर सुरू होईल. आपले फोटो आणि चित्रफीत या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत. स्पर्धसाठी निश्चित केलेल्या विषयावर पाच फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा चित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी अविराज मराठे ७३८५७६९३२८, प्रणब सलगरकर - ८६६९०५८३२५, या व्हॉट्सअप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे. १० ते १९ सप्टेंबर या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला २१ हजार, द्वितीय १९ हजार, तृतीय ५ हजार आणि उत्तेजनार्थ १ हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल. आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम सजावटी निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांचा राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल. स्पर्धतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.
बाप्पाचं स्वागत आणि मताधिकाराचा जागर एकाच मखरात करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी केले आहे.