रौप्य महोत्सवी वर्षात कोमसाप देणार सात संमेलनांची मेजवानी
By admin | Published: September 5, 2014 10:48 PM2014-09-05T22:48:21+5:302014-09-05T23:29:47+5:30
संस्थाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर व रौप्य महोत्सवी संमेलन समितीप्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांनी घोषणा केली
रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या सभेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोकणच्या सात जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थाध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर व रौप्य महोत्सवी संमेलन समितीप्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांनी केली. कोमसाप मध्यवर्ती संस्थेची सभा केळवे (पालघर) येथे पार पडली. यावेळी कोमसापचे संस्थापक मधुमंगेश कर्णिक, विश्वस्त निवृत्त न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, अरूण नेरूरकर, कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह प्रा. अशोक ठाकूर, प्रशांत परांजपे, संमेलन समितीप्रमुख रवींद्र आवटी, ठाणे जिल्हाध्यक्ष शशिकांत तिरोडकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश खटावकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन म्हात्रे, पालघर जिल्हाध्यक्ष आर. एम. पाटील, ग्रंथ प्रकाशन समितीप्रमुख गौरी कुलकर्णी, केशवसुत स्मारक समितीचे गजानन पाटील, नलिनी खेर आदी उपस्थित होते.
रौप्य महोत्सवी वर्षामध्ये कोकणच्या सातही जिल्ह्यांमध्ये जिल्हा संमेलनांचे आयोजन व विविध पातळ्यांवर साहित्य चळवळ जोमाने कार्यरत करण्यात येणार आहे. महिला, युवक, कुमार गटातील साहित्यप्रेमींकरिता विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. कथालेखन, काव्यलेखन कार्यशाळा, गझल काव्यशाळा, अभिवाचन कार्यशाळा अशा विविध माध्यमांव्दारे लेखन वाचन चळवळीला झळाळी आणण्याकरिता कृतीत्मक कार्यक्रमांची आखणी करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष नमिती कीर यांनी यावेळी जाहीर केले. तसेच यानिमित्ताने कथालेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. रौप्य महोत्सवी वषार्निमित्त होणाऱ्या या संमेलनाना मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. रौप्य महोत्सवी वर्षामध्ये मुख्य संमेलन हे रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे वैशिष्ट्यपूर्ण व साहित्य मुल्यांची उंची गाठणारे लक्षवेधी संमेलन करण्याचे आवाहन मधुमंगेश कर्णिक यांनी केले. या सभेमध्ये नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याच्या कोमसाप बोईसर ५९च्या शाखेला मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)