शेतकऱ्यांच्या डाेक्याला हाेताेय ‘ई-पीक’ पाहणीचा ताप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:38 AM2021-09-09T04:38:42+5:302021-09-09T04:38:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-पीक’ ॲप सुरू केले असून, त्यामध्ये शेतकऱ्याला स्वत:च शेती, सातबारा, तसेच पीक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘ई-पीक’ ॲप सुरू केले असून, त्यामध्ये शेतकऱ्याला स्वत:च शेती, सातबारा, तसेच पीक पेरा नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी असून, आतापर्यंत अवघ्या ७९२ शेतकऱ्यांनी ‘ई-पीक’ ॲपसाठी नोंदणी केली आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचा असलेला अभाव तसेच ॲंड्राॅईड मोबाइल नसल्यामुळे या ॲपला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे.
‘ई-पीक’ पाहणीमध्ये पिके, फळबाग, बांधावरची झाडे यांची नोंद प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावी लागते. ॲपवर पिकाची माहिती भरण्यापूर्वी ज्या सर्व्हेनंबरचा पीक पेरा शेतकरी भरणार आहे त्याबाबत माहिती अगोदर काढून ठेवावी लागते. शेत जमिनीची अचूक जागा, गाव नमुना आठ अ, सातबारा आवश्यक आहे. शेतात माेकळ्या जागेत उभे राहून फोटो घेऊन अक्षांश व रेखांश घ्यावे लागतात. त्यासाठी इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे. मात्र, काही गावात इंंटरनेटची समस्या असल्यामुळे ‘ई-पीक’ ॲपमध्ये पीक पेरा नोंद करणे अशक्य होत आहे. शिवाय ग्रामीण भागात कित्येकांकडे साधे मोबाईल असल्याने त्यामध्ये नोंद शक्य नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेटही आहे मात्र माहितीच्या अभावामुळे पीक पेरा नोंदणी शक्य होत नसल्याने कृषी विभागातर्फे कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कार्यशाळेमुळे ॲपची माहिती सोपी
शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतीचे क्षेत्र नोंदणी करण्यासाठी शासनाने तयार केलेले ‘ई-पीक’ ॲप नक्कीच फायदेशीर आहे. कृषी विभागाकडून ‘ई-पीक’ ॲप, नोंदणी करण्याबाबतच माहिती, त्याचे महत्त्व कार्यशाळेव्दारे पटवून देण्यात आल्याने ॲपवर पीक पेरा नोंदणी सोपी झाली. त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. नेटमुळे नोंदणी करताना व्यत्यय येतो.
- मंदार झापडेकर, जयगड
कृषी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी ‘ई-पीक’ ॲप बद्दल माहिती देत आहेत. प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन नोंदणी करावी लागते. तत्पूर्वी सातबारा, गाव नमुना ही माहिती गरजेची आहे. ॲपबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती सुरू केली असून, ती अजून प्रभावी होणे गरजेचे आहे. स्वत:च्या पीक क्षेत्र व त्याबाबतची माहिती यासाठी ॲप फायदेशीर आहे.
- रोहन पाष्टे, निवळी
शेतकऱ्यांना ई-पीक ॲपमध्ये पिकाची निवड केल्यानंतर पिकाचे निवड करून क्षेत्राची नोंद करता येणार आहे. शेतकऱ्यांना या ॲपची माहिती व्हावी, यासाठी विभागवार कार्यशाळेचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ॲपची माहिती दिल्यानंतर बऱ्यापैकी प्रतिसाद लाभत आहे.
- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी
जिल्ह्यात भात पीक पेरणी/भात लावणी केलेल्या क्षेत्राची हेक्टरमध्ये नोंद करावी.
सातबारावरील एकूण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र भरता येणार नाही.
सामायिक खातेदारांपैकी कोणत्याही एका खातेदाराने पूर्ण क्षेत्र भरावे.